कोलवाळ सरपंचपदासाठी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

कोलवाळ पंचायतीच्या अंतर्गत राजकारणात आपल्याला रस नाही; पंचायतसदस्यांनीच तो निर्णय घ्यायचा आहे, अशी भूमिका हे दोघेही आजी-माजी आमदार घेत असले तरी समर्थक पंचायतसदस्यांच्या माध्यमातून या पंचायत मंडळावर स्वत:चे वर्चस्व ठेवण्याच्या बाबतीत ते प्रयत्नशील असल्याची माहिती खुद्द पंचसदस्यांनीच दिली. 

म्हापसा: कोलवाळ पंचायतीच्या नवीन सरपंचाच्या निवडीसंदर्भात सध्या नीळकंठ हळर्णकर व किरण कांदोळकर या आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून राजकारणातील स्वत:ची पत सांभाळण्यासाठी या दोघाही राजकीय नेत्यांच्या अंतर्गत हालचाली सुरू आहेत.

थिवी मतदारसंघातील बहुतांश पंचायतींवर अर्थांत आठपैकी सहा पंचायतींवर सध्या किरण कांदोळकर यांचे वर्चस्व आहे. हळर्णकर यांच्या बाजूने असलेली एकमेव पंचायत म्हणजे कोलवाळ. त्यामुळे ही पंचायत राखून ठेवणे त्यांच्या दृष्टीने तसेच भाजपाच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. पीर्ण पंचायतीवर भाजपासमर्थक पंचसदस्यांचा गट सत्ताधारी गटात असल्याने ती पंचायत आपसूकच हळर्णकर यांच्या खात्यात जमा होते. अस्नोडा, नादोडा, रेवोडा, थिवी, कामुर्ली व शिरसई या सहा पंचायतींवर सध्या कांदोळकर यांचेच वर्चस्व आहे. 

कोलवाळ पंचायतीच्या अंतर्गत राजकारणात आपल्याला रस नाही; पंचायतसदस्यांनीच तो निर्णय घ्यायचा आहे, अशी भूमिका हे दोघेही आजी-माजी आमदार घेत असले तरी समर्थक पंचायतसदस्यांच्या माध्यमातून या पंचायत मंडळावर स्वत:चे वर्चस्व ठेवण्याच्या बाबतीत ते प्रयत्नशील असल्याची माहिती खुद्द पंचसदस्यांनीच दिली. 

या पंचायतीवर गेल्या सुमारे पंचवीस-तीस वर्षांच्या काळात निळकंठ हळर्णकर यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. ते स्वत: चार कार्यकाळांसाठी सरपंचपदी होते. त्यानंतर ते आमदारपदी असतानाही त्यांच्याच समर्थक गटाची सत्ता या पंचायतीवर आहे. किरण कांदोळकर हे आमदारपदी असताना त्यांचे समर्थन करणारे पंचायत मंडळ केवळ साधारणत: वर्षभराच्या काळासाठी सत्तास्थानी होते. 

सध्या या पंचायत मंडळातील नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य हळर्णकर गटाचे समर्थक असून, विरोधी गटात तीन पंचायतसदस्य आहेत. नवीन सरपंच म्हणून आमदार निळकंठ हळर्णकर यांचे समर्थक मानले जाणारे बाबनी साळगावकर यांची निवड होण्याची शक्यता आहे. तसेच, त्या पदासाठी शीतल चोडणकर व विद्यमान उपसरपंच अजक्षा फडते यांचीही नावे चर्चेत आहेत. दरम्यान, आम्ही सर्व सहाही जण संगनमताने नवीन सरपंचाची निवड करणार आहोत, असे माजी सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

या नऊ-सदस्यीय पंचायत मंडळासाठी विद्यमान कार्यकाळासाठी निवडणूक झाल्यानंतर सर्वप्रथम माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या गटाचे म्हणून मानले जाणारे दशरथ ऊर्फ परेश बिचोलकर यांची सरपंचपदी, तर रती वारखंडकर यांची उपसरपंचपदी निवड झाली होती. काही काळानंतर विद्यमान आमदार निळकंठ हळर्णकर यांच्या गटातील पंचायतसदस्य असल्याचे मानले जाणाऱ्या अजक्षा फडते, राधिका बांदेकर व मायकल फर्नांडीस यांनी किरण कांदोळकर यांच्याच गटातील पंचायतसदस्य नित्यानंद कांदोळकर, बाबनी साळगावकर व शीतल चोडणकर यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे, दशरथ बिचोलकर व रती वारखणकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव संमत होऊन जानेवारी २०१९ मध्ये नित्यानंद कांदोळकर यांची सरपंचपदी व अजक्षा फडते यांची उपसरपंचपदी निवड झाली होती. तेव्हापासून आमदार निळकंठ हळर्णकर यांच्या गटाचे वर्चस्व या पंचायतीवर पुन्हा प्रस्थापित झाले होते. सध्या कोलवाळ पंचायतीच्या सत्ताधारी गटात उपसरपंच अजक्षा फडते, बाबनी साळगावकर, शीतल चोडणकर, मायकल फर्नांडीस, राधिका बांदेकर व राजीनामा दिलेले सरपंच नित्यानंद कांदोळकर या सहा जणांचा यांचा, तर विरोधी गटात परेश बिचोलकर, रितेश वारखंडकर व प्रियंका बिचोलकर या तिघांचा समावेश आहे. 

कोलवाळमधील भंगारअड्डे हटवण्यासंदर्भात पंचायतीने कार्यवाही केल्यानंतर त्याला पंचायत संचालकाने स्थगिती दिल्याने सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी अलीकडेच राजीनामा दिला असला तरी तो राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. नित्यानंद कांदोळकर यांनी स्वत:च्या राजीनाम्याचे कारण वेगळेच दिले असले तरी तेवढ्या कारणासाठी राजीनामा देणे शक्यच नाही, असा दावा विरोधी गटातील पंच सदस्य रती वारखंडकर यांनी केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, हा सत्ताधारी गट अजूनही एकसंध असून पंचायत सदस्यांमध्ये झालेल्या अंतर्गत करारानुसार त्यांनी राजीनामा दिलेला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या