‘कोविड’ साहित्य खरेदीची श्‍वेतपत्रिका जारी करा: ट्रोजन डिमेलो

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

राज्य सरकार कोविड महामारी हाताळण्यास अपयश आले आहे. आरोग्य व आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर खरेदी केलेल्या साहित्याची माहिती श्‍वेतपत्रिका काढून लोकांसमोर मांडावी.

पणजी: राज्य सरकार कोविड महामारी हाताळण्यास अपयश आले आहे. आरोग्य व आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर खरेदी केलेल्या साहित्याची माहिती श्‍वेतपत्रिका काढून लोकांसमोर मांडावी. आमदारांना काहीच कामे नसल्याने त्यांचे वेतन व इतर मिळणारे भत्ते त्वरित बंद करण्याची मागणी काँग्रेसतर्फे आज करण्यात आली. 

पणजीतील काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले की, राज्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विरोधकांनी सरकारला वारंवार तयारी करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र गोवा राज्य ग्रीन झोनमध्ये असल्याच्या भ्रमात राहिल्याने ही परिस्थिती ओढळून घेतली आहे. कोरोना संसर्गाचे दरदिवशी वाढणारे प्रमाण सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे आता लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. कोविड इस्पितळ तसेच कोविड निगा केंद्रात कोरोना संसर्ग रुग्णांना ठेवले जात असले उपचाराबाबत लोकांच्या मनात 

अजूनही शंका आहे. खासगी इस्पितळातील डॉक्टर्स व सरकारी यंत्रणाचे कोविड उपचारसंदर्भात लागेबांधे आहेत त्यामुळे सामान्यांची पिळवणूक करून पैसे मिळवण्याचा व्यवसाय झाला आहे अशी टीका डिमेलो यांनी केली. 

राज्यातील प्रत्येक नागरिकाला राज्याची आर्थिक स्थिती तसेच कोविड - १९ साथीवर सरकार काय करत आहे याची माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने यासंदर्भातची श्‍वेतपत्रिका काढावी. सध्याचे सरकार कार्यरत नसल्याने आमदारांची भूमिका शून्य आहे त्यामुळे त्यांना वेतन व भत्ते देण्याची गरज नाही. 

विरोधकांनी विचारलेल्या प्रश्‍नावर सरकार उत्तर देत नाही. कोविड - १९ च्या सुरुवातीच्या काळात सरकारने या महामारीला रोखण्यात यश मिळवल्याबाबत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली होती मात्र त्यानंतर काही दिवसांनी कारोना संसर्गाची संख्या वाढू लागल्याने योग्यवेळी निर्णय घेण्यास अपयशी ठरले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या