काँग्रेस नेते - पवार भेटीची चर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि काँग्रेसचे विधीमंडळ गट प्रमुख दिगंबर कामत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची घेतलेली भेट आज राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरला आहे.

पणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि काँग्रेसचे विधीमंडळ गट प्रमुख दिगंबर कामत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची घेतलेली भेट आज राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरला आहे. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या भेटीची छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारीत केल्यावर या भेटीची चर्चा सुरू झाली.

दोनापावल येथे नव्याने सुरू झालेल्या ताज समूहाच्या हॉटेलमध्ये आज सायंकाळी उशिरा या भेटी झाल्या. सुरवातीला चोडणकर यांनी पवार यांची भेट घेतली. त्यानंतर कामत तेथे पोहोचले. चोडणकर यांनी ही भेट सदिच्छा भेट होती, असे रात्री ‘गोमन्तक’ला सांगितले, तरी एवढ्या तातडीने पवार यांच्या भेटीसाठी काँग्रेसचे नेते पोहोचले, त्यावरून नक्कीच काहीतरी राजकीय व्‍यवस्था आकाराला येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल अलीकडे गोव्यात होते. त्यावेळी सत्ताधारी गटातील काही अस्वस्थ आमदार, मंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती उजेडात आली होती. कामत हे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत भागीदार होती. त्यावेळी पाच वर्षे सुरळीत सरकार चालवण्‍यास कामत यांना पवारांनी मार्गदर्शन व साह्य केल्याचे मानले जाते. त्यामुळे आता कामत यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी पोचवण्यासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पवार हे पुढाकार घेणार का? असाही प्रश्न चर्चेत आला आहे.

राजकीय चर्चांना प्रारंभ

काँग्रेसने यापूर्वीच ‘एकला चलो रे’चे धोरण अवलंबल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस वगळता इतरांशी आघाडी होऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते कामत आणि प्रमुख विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर हे पवार यांची भेट घेतात याला मोठा राजकीय अर्थ असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांची आघाडी असल्याने निवडणूकपूर्व आघाडी गोव्यात आकाराला आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून पावले टाकली जातील का? याकडे राजकीय वर्तुळाचे आता लक्ष आहे. चोडणकर हे पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले तेव्हा तेथे आश्विन खलप हेही उपस्थित होते. चोडणकर यांनी त्यांच्या समक्षच पवार यांची भेट 
घेतली.

संबंधित बातम्या