गोव्यात काॅंग्रेसची अवस्था भरकटलेल्या पतंगासारखी

Goa Congress.jpg
Goa Congress.jpg

पणजी: कॉंग्रेस पक्ष उसने अवसान आणून पुढील विधानसभा निवडणुकीत समविचारींंना सोबत घेऊन विजय संपादन करण्याची स्वप्न पाहत असला तरी सध्या पक्षाची गत भरकटलेल्या पतंगासारखी झाली आहे. पक्षाची डिजीटल सदस्यत्व मोहीम कुठे पोचली याचा पत्ता नाही, शिवाय समित्या फेररचनेची मुदत टळून गेली तरी समित्यांची फेररचना झालेली नाही.

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दोनवेळा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा फेटाळला गेल्याचे पत्र कुठे प्रसारीत झालेले नाही. मात्र ते कार्यरत नाहीत. सदस्यत्व मोहिमेच्या सुरवातीला राज्यात आलेले राज्य प्रभारी दिनेश राव त्यानंतर कुठे फिरकलेले नाहीत. पाच आमदारांची एकवाक्यता आहे या याविषयी शंका यावी, असे वातावरण सध्या पक्षात आहे. प्रदेशाध्यक्ष चोडणकर हे राजकीय खिंड लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना म्हणावी तशी साथ इतरांची मिळते आहे असे काही दिसून आलेले नाही.

जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेसने सपाटून मार खाल्ला. पालिका निवडणुकीतही कॉंग्रेसने चमक दाखवलेली नाही. कुंकळ्ळी पालिकेतील यश हे युरी आलेमाव यांचे की कॉंग्रेसचे याविषयी दुमत आहेच. आता होऊ घातलेल्या म्हापसा, मुरगाव, मडगाव, केपे व सांगे पालिका निवडणुकीपैकी मडगावात यश मिळाले तर ते आमदार विजय सरदेसाई यांच्याशी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व  आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी  केलेल्या हात मिळवणीमुळेच हे लक्षात घ्यायला हवे. मुरगावमध्येही विजय मिळाला तर तो एकट्या प्रदेश उपाध्यक्ष संकल्‍प आमोणकर यांचा असेल. 

कोविडचा प्रसार वाढल्याचे कारण पुढे करून ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भेटण्याची मोहिम पुढे ढकलण्यात येत असल्याचे कॉंग्रेसने जाहीर केले असले तरी मध्यंतरी आंदोलने करून पक्ष जीवंत असल्याचे भासवणारी युवा नेत्यांची फळीही आता तेवढी सक्रीय राहिलेली नाही हेही तेवढेच खरे आहे.
दरम्यानच्या काळात काही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. मात्र यावेळी सदस्यत्व मोहिम समन्वय समिती अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप व सहअध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. केवळ प्रदेशाध्यक्ष व नेहमीचेच चेहरे यावेळी उपस्थित होते.(In Goa, the Congress party is getting weaker)

डिजिटल सदस्यांची आकडेवारी किती?
कॉंग्रेसनेच जाहीर केलेल्या तारखांनुसार 12 फेब्रुवारी रोजी मडगाव येथे डिजीटल सदस्य मोहिमेची सुरवात होणार होती, ती झाली. 13 फेब्रुवारीला म्हापसा येथे या मोहिमेची झालेली सुरवात जगाला समजलीच नाही. 10 मार्चपर्यंत सदस्यत्व मोहिम पूर्ण होईल असे म्हटले होते. त्यानंतर आजवर किती सदस्य झाले याची आकडेवारी पक्षाने जाहीर केलेली नाही. यामुळे सांगण्यासारखी आकडेवारी जमा झालेली नाही असे अनुमान काढता येते. 11 मार्च ते 25 मार्चपर्यंत गट समित्यांची फेरस्थापना करण्यात येणार होती. 26 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत जिल्हा समित्यांची फेरस्थापना  करण्यात येणार होती. हे सारे न झाल्याने 25 एप्रिलपर्यंत कॉंग्रेस प्रदेश समितीची फेररचना कशी करेल हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या विषयावर बोलत असताना, कॉंग्रेसला मरगळ आलेली नसुन आम्ही निवडणुकीत उमेदवार म्हणून नवे चेहरे देण्यावर ठाम आहोत. कोविड काळामुळे समित्यांची फेररचना थोडी पुढे मागे झाली आहे पण आम्ही पक्ष संघटना बळकट करण्यावर ठाम आहोत. अनेक नेते कॉंग्रेसकडे वळत आहेत यावरून पक्षाला उज्ज्वल भवितव्य आहे हे दिसून येते, असे मत व्यक्त केले आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com