काँग्रेसमधील राजीनामा नाट्यावर अखेर तात्‍पुरता पडदा; गिरीश चोडणकर यांच्याकडे पद कायम

गोेमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकजण दावेदार असल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे वाद नको यासाठी तूर्त गिरीश चोडणकर यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवण्यावर काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे चोडणकर यांच्या राजीनाम्याबाबत योग्यवेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे धोरण अवलंबले जाण्याची शक्यता आहे

पणजी- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकजण दावेदार असल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे वाद नको यासाठी तूर्त गिरीश चोडणकर यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवण्यावर काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे चोडणकर यांच्या राजीनाम्याबाबत योग्यवेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे धोरण अवलंबले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदार, पदाधिकारी, नेते यांच्याशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव आज राज्यात दाखल झाले. ते उद्याही गोव्यात असतील.

जिल्हा पंचायत निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणे हा गिरीश चोडणकर यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. मीही याबाबत सर्वांशी बोलून त्‍यांची मते जाणून घेऊन पक्षश्रेष्ठींना त्याबाबत अवगत करणार आहे, असे दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.
दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये आज त्यांनी आमदार, जिल्हा पंचायत उमेदवार आणि काही पदाधिकाऱ्यांबरोबर एकेक करून संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, यश मिळाल्यानंतर दावा करण्यासाठी अनेकजण पुढे येतात, तसे अपयशाबाबत नाही. त्यासाठीही अनेकजण जबाबदार असतात. ती सामूहिक जबाबदारी असते. ती सर्वांनीच स्वीकारली पाहिजे. कोणा एका नेत्यावर त्यासाठी बोट दाखवता येणार नाही. मी दोन दिवस चर्चा करणार आहे. मात्र, त्यातून नेमकी काय माहिती समोर आली, ती सार्वजनिकरीत्या सांगता येणार नाही. कारण तो पक्षांतर्गत विषय आहे. त्याविषयी केवळ पक्षश्रेष्ठींनाच माहिती दिली जाणार आहे.

याबाबत विधिमंडळ गटनेते दिगंबर कामत यांना विचारले असता ते म्हणाले, ते (दिनेश गुंडुराव) सगळ्यांची मते जाणून घेतील. मी कशासाठीही आता इच्छूक नाही. मी उद्या (विरोधी पक्ष नेते पदावर की पक्षात?) असेन की नाही हे सांगता येणार नाही. सारे निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतात तेच ठरवतील.

रेजिनाल्‍ड यांचीही दखल घेणार

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर स्वीकारू, असे वक्तव्य केले आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधल्‍यावर ते म्हणाले, रेजिनाल्ड हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तीनवेळा ते आमदार झाले आहेत. त्यांच्या म्हणण्याचीही दखल घेतली गेली जाणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यावर आमच्या पक्षाचा विश्वास आहे. मात्र पक्ष निर्णय घेताना पक्षहित लक्षात ठेऊनच निर्णय घेतो.
 

संबंधित बातम्या