गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा; जिल्हा पंचायत निवडणुकीतील दारूण पराभवानंतर घेतला निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने याची नैतिक जबाबदारी घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा कॉंग्रेस श्रेष्ठी व गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याकडे सादर केला आहे.

पणजी :  जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने याची नैतिक जबाबदारी घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा कॉंग्रेस श्रेष्ठी व गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याकडे सादर केला आहे.

दरम्यान, गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती. याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. अनेक नेत्यांनी चोडणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्याशी कुणाचाही संपर्क होऊ शकला नव्हता. चोडणकर यांनी राजीनामा सादर केल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत आलेला पराभव व कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफूस याला कंटाळून चोडणकर यांनी त्यावेळी राजीनामा दिला होता. मात्र पक्षश्रेष्ठींनी तो स्वीकारला नव्हता. त्यांना पक्षाचे काम करत राहण्याची सूचना करण्यात आली होती. आता जिल्हा पंचायत निवडणुकीत आलेल्या अपयशाचे खापरही कॉंग्रेसमधील नेत्यांनी चोडणकर यांच्यावर फोडले आहे. काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही याची कबुली चोडणकर यांनी जिल्हा पंचायत निकाल लागल्यानंतर दिली होती. त्यांच्या नेतृत्वावर काँग्रेस कार्यकर्ते तसेच आमदारांनी टीका केल्याने चोडणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

गिरीश चोडणकर यांनी यापूर्वीच राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला होता मात्र तो स्वीकारण्यात आला नव्हता त्यामुळे ते या पद सांभाळत होते. पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी राज्यभरात गट समित्या स्थापन करण्यास सांगूनही चोडणकर यांनी त्या केल्या नसल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीही प्रदेशाध्यक्षांवर टीका करताना जिल्हा पंचायत निवडणुकीतील पराभवाला काँग्रेसचे नेतृत्वच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. चारही बाजूंनी होणाऱ्या टिकेमुळे प्रदेशाध्यक्षपदाचा चोडणकर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

अधिक वाचा :

गोवा पंचायतराज कायद्यात दुरुस्ती करून पंचायतींच्या खर्चमर्यादेत वाढ करणार 

होली ग्रुपच्यावतीने गोवा मुक्तिदिनी आयनॉक्समध्ये ‘हॉटेल मुंबई‘ चा शो

राष्ट्रपतींनी गोवा सरकारच्या निमंत्रणाला नकार देऊन दौरा टाळावा

संबंधित बातम्या