व्यवसाय ‘कॉर्पोरेट’ क्षेत्राकडे देण्याचे षडयंत्र; कृषी विधेयक स्थगित ठेवावे अन्यथा आंदोलन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सुदीप ताम्हणकर म्हणाले की, केंद्रात आता भाजप सरकारचे संख्याबळ असल्याने विधेयके मंजूर करून घेत आहेत. या विधेयकाद्वारे शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी कॉर्पोरेटशी करार करण्याचा त्यामागील प्रयत्न आहे अशी टीका त्यांनी केली. 

पणजी: राज्यसभेत मंजूर केलेले  कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी मारक ठरणार आहे. या विधेयकामुळे उत्पादन केलेला माल शेतकऱ्यांना स्वतःलाच विक्री करण्याची पाळी येणार आहे. हा व्यवसायही आता मोठमोठ्या कंपन्यांच्या हाती देण्याचा केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. या विधेयकाचा निषेध करण्यात येत असून ते गोवा सरकारने स्थगित ठेवावे अन्यथा २०१७ सालाप्रमाणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अखिल गोवा बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिला.

या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला सरकारकडून जी आधारभूत किंमत तरतूद होती ती यापुढे मिळणार नाही. यापूर्वी गोव्यातील शेतकऱ्यांनी कंत्राटी शेतीला विरोध झाला होता. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या उपयोगात आणण्याचा प्रयत्न होता. जमिनी शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची अधिक शक्यता आहे. शेतकऱ्यांसंदर्भात स्वामीनाथन अहवाल सरकार का स्वीकारत नाही किंवा त्यावर विचार केला जात नाही असा प्रश्‍न करून ताम्हणकर म्हणाले की, केंद्रात आता भाजप सरकारचे संख्याबळ असल्याने विधेयके मंजूर करून घेत आहेत. या विधेयकाद्वारे शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी कॉर्पोरेटशी करार करण्याचा त्यामागील प्रयत्न आहे अशी टीका त्यांनी केली. 

शेती व्यवसायात राज्यातील बहुजन समाज मोठ्या संख्येने आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे बहुजन समाजाचे आहेत त्यामुळे त्यांनी ज्याप्रकारे कंत्राटी शेती व्यवसाय विधेयक स्थगित ठेवले आहे त्याप्रमाणेहे कृषी विधेयक राज्यासाठी लागू करू नये. त्याऐवजी कित्येक वर्षे प्रलंबित असलेली कूळ - मुंडकार प्रकरणे पडून आहेत ती निकालात काढून भूमीपुत्रांचे प्रश्‍न प्राधान्यक्रमाने धसास लावावेत. त्यांना मालकी हक्क व न्याय द्यावा. देशाचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन) घसरला आहे. कृषी क्षेत्रात तो ३ ते ४ टक्के आहे मात्र या कृषी विधेयकामुळे शेती व्यवसाय उत्पादनाचा माल या कॉर्पोरेट क्षेत्राच्या हाती देण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे, असे ते म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या