गोवेकरांनो आपल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी या नंबर वर संपर्क करा

गोवेकरांनो आपल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी या नंबर वर संपर्क करा
Goa Contact this number to enquire about the condition of Corona patients

पणजी: राज्यात टाळेबंदी (लॉकडाऊन) लादणे हा कोविड प्रसार रोखण्यावरील प्रभावी उपाय नव्हे, याचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड व्यवस्थापनात जनतेने साथ द्यावी, असे आवाहन केले. वैद्यकीय प्राणवायू (मेडिकल ऑक्सिजन) पुरवण्यासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरात १५ दिवसांत प्रकल्पाची उभारणी केली जाईल आणि बांबोळी येथे अतिविशिष्ट उपचार विभाग इमारतीत 15 मे पर्यंत नवे कोविड इस्पितळ सुरू केले जाईल, अशी आश्वासक माहितीही मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना दिली. समाज माध्यमांच्या माध्यमातून शनिवारी सायंकाळी सात वाजता सुमारे अर्धा तास मुख्यमंत्र्यांनी हा संवाद साधला.(Goa Contact this number to enquire about the condition of Corona patients)

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा वाढदिवस असतानाही पूर्ण दिवसभरात कोविड व्यवस्थापनावर भर दिला. साप्ताहिक बाजारात लोकांनी केलेल्या गर्दीची छायाचित्रे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली होती. त्यावरून ते अस्वस्थ झाले. त्यांनी लोकांवर निर्बंध घालण्यासाठी काय करता येईल याविषयी सहकारी मंत्र्यांची मते जाणून घेतली. गेल्या वर्षी कोविड महामारीच्या काळात पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, आमदार यांना सहभागी करून एक व्यवस्थापन साखळी सरकारने उभारली होती. तशीच यंत्रणा आताही आकारला आणण्याचे ठरले. त्यानुसार दुपारी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधला. सध्या विनाकारण जनतेने घराबाहेर पडून संचार करणे राज्याला कसे धोकादायक ठरू शकते याविषयी त्यांना माहिती देण्यात आली.

रुग्णांची विचारपूस येथे करा
गेले वर्षभर डॉक्टर, परिचारीका व वैद्यकीय कर्मचारी कोविड उपचारात असल्याने त्यांच्यावर ताण आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णांकडे दुर्लक्ष होते असा दावा करून त्यांच्यावरील ताण वाढवू नये. रुग्णांची विचारपूस मडगाव कोविड इस्पितळ - 0832 2703036, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ - 832 2727300, फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात 7020973897 या क्रमांकावर करता येईल. गोमेकॉसाठीचा क्रमांक उद्या जाहीर करण्यात येईल.

शुभेच्छा दिलेल्यांचे मानले आभार

वाढदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दूरध्वनीवर शुभेच्छा दिल्या असे नमूद करून त्यांनी समाज माध्यमांद्वारे, संदेश पाठवून शुभेच्छा देणाऱ्यांचा आपण ऋणी आहे असेही त्यांनी नमूद केले.

‘दोन वर्षे सातत्याची, सत्याची...’

गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यावर अनेक संकटे आली. त्यातून कोविड व्यवस्थापन व आर्थिक व्यवस्थापन शिकलो असे नमूद करून ते म्हणाले, ‘दोन वर्षे सातत्याची, सत्याची, विश्वासाची’ ही पुस्तिका प्रकाशित केली असून ती समाज माध्यमावर उपलब्ध केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com