आरोग्य केंद्रांचे व्यावसायिक आस्थापनांत रूपांतर; विजय भिके यांची सरकारवर टीका

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

कोविडसंदर्भात उपचार करणाऱ्या खासगी इस्पितळांत रुग्णांकडून प्रमाणाबाहेर बिलांची आकारणी केली जात असून सरकारने आरोग्य केंद्रांचे रूपांतर व्यावसायिक केंद्रांत केल्याची टीका उत्तर गोवा काँग्रेस समितीच्यावतीने बोलताना अध्यक्ष विजय भिके यांनी केली आहे.

म्हापसा: कोविडसंदर्भात उपचार करणाऱ्या खासगी इस्पितळांत रुग्णांकडून प्रमाणाबाहेर बिलांची आकारणी केली जात असून सरकारने आरोग्य केंद्रांचे रूपांतर व्यावसायिक केंद्रांत केल्याची टीका उत्तर गोवा काँग्रेस समितीच्यावतीने बोलताना अध्यक्ष विजय भिके यांनी केली आहे.

कोविडसंदर्भातील वैद्यकीय उपचारांबाबत राज्य सरकारकडून अनियमबद्धता होत असल्याचा दावा भिके यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत करून, सरकारने यासंदर्भात हस्तक्षेप करावा व गरीब लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी पक्षाचे उत्तर गोवा सरचिटणीस भोलानाथ घाडी, म्हापसा गट अध्यक्ष मिताली गडेकर व माजी नगरसेवक आंतोनियो आल्वारीस उपस्थित होते.

मूलभूत उपचारांसाठी तीन ते चार लाख रुपयांपर्यंतचे बिल खासगी इस्पितळांमध्ये आकारले जात आहे, असे श्री. भिके यांनी निदर्शनास आणून दिले. ही खासगी इस्पितळे रुग्णांकडून आगाऊ रक्कम स्विकारतात व त्या रकमेनुसारच संबंधित रुग्णांना इस्पितळात दाखल करून घेतात, असा आरोपही त्यांनी केला. सध्या शासकीय इस्पितळांत पुरेशा सुविधा नसल्याले लोक खासगी इस्पितळांत दाखल होण्यास प्राधान्य देत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते, अशा घटना सातत्याने घडत असल्याचेही निदर्शनास आणू्न देत श्री. भिके यांनी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात सरकार असमर्थ ठरत असल्याबद्दल टीका केली व लोकांना आता स्वत:च्या घरीच प्राणवायूच्या सिलिंडर्सची सोय करावी लागेल, असा टोलाही त्यांनी सरकारला हाणला. अप्रमाणशीर वाढीव बिलांच्या विरोधात खासगी रुग्णालयांसमोर आंदोलन करण्याचा इशाराही उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसच्या वतीने या वेळी देण्यात आला.  खासगी रुग्णालयांत वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांना त्यासंदर्भातील बिले चुकती करणे शक्यच होणारच नाही, असा दावाही श्री. भिके यांनी केला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या