साई मंदिराजवळच्या अंडरपासवर `कॉन्वेक्‍स मिरर`ची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

मंदिरात श्रीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांबरोबरच मुख्य रस्त्यावरून जाणारे काही पर्यटकही मुद्दामहून या मंदिराकडे थांबतात व श्रीचे दर्शन घेतात. त्यामुळे भाविक भक्तांबरोबरच पर्यटकांचीही ये-जा मंदिरात असल्याने अंडरपास तसेच जोडरस्त्यावर वाहनांचीही वर्दळ असते. 

जुने गोवे: सुरळीत वाहतुकीसाठी रस्ता रुंदीकरण आणि चौपदरी रस्ते उभारले असले तरी बऱ्याच ठिकाणी नियोजन नसल्याने अपघातांचे सत्र सध्या सुरू आहे. जुने गोवे येथील पणजीला जाणाऱ्या बगल मार्गावरील साईबाबा देवालयाजवळील अंडरपासवरही असाच वाहतुकीचा घोळ असून या ठिकाणी अधूनमधून अपघात होत असल्याने देवालयाजवळील या अंडरपासवर जोड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज यावा यासाठी "कॉन्वेक्‍स मिरर'' बसवावा अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

जुने गोवे ते रायबंदर येथील बगल मार्गावरील हे साईबाबा मंदिर प्रसिद्ध असून साईभक्तांची या मंदिरात कायम वर्दळ असते. विशेषतः गुरुवारी साप्ताहिक उत्सव दिवशी ही गर्दी जास्त असते. 

मंदिरात श्रीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांबरोबरच मुख्य रस्त्यावरून जाणारे काही पर्यटकही मुद्दामहून या मंदिराकडे थांबतात व श्रीचे दर्शन घेतात. त्यामुळे भाविक भक्तांबरोबरच पर्यटकांचीही ये-जा मंदिरात असल्याने अंडरपास तसेच जोडरस्त्यावर वाहनांचीही वर्दळ असते. 

जुने गोवे ते रायबंदरच्या दरम्यानच्या या साईबाबा देवालयाजवळ अंडरपासमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांना जोडरस्त्यावरील वाहन दिसत नाही. त्यामुळेच हे अपघात होत आहेत. 

भर देवालयासमोर अशा प्रकारचे अपघात होत असल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासकीय यंत्रणेने या ठिकाणी कॉन्वेक्‍स मिरर बसवल्यास जोडरस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज अंडरपासमधून येणाऱ्या वाहनांना मिळू शकतो, त्यामुळे अपघात टाळले जाणे शक्‍य असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. 

या ठिकाणी कारगाडी तसेच दुचाकींचे अपघात होत असल्याने सरकारी यंत्रणेने तसेच जुने गोवे पंचायतीनेही या प्रकरणी योग्य दखल घ्यावी. संभाव्य अपघात दूर करावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या