गोवा सहकार चळवळीचा कणा मजबूत करा: सहकारमंत्री गोविंद गावडे

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

राज्यातील सहकार क्षेत्राच्या चळवळीत झोकून देऊन समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या सहकार समाजकार्यकर्त्यांसाठी गोवा सहकार श्री, गोवा सहकार रत्न व गोवा सहकार भूषण पुरस्काराचा प्रस्ताव सरकारकडे मांडणार आहे

पणजी : राज्यातील सहकार क्षेत्राच्या चळवळीत झोकून देऊन समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या सहकार समाजकार्यकर्त्यांसाठी गोवा सहकार श्री, गोवा सहकार रत्न व गोवा सहकार भूषण पुरस्काराचा प्रस्ताव सरकारकडे मांडणार आहे अशी घोषणा सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी आज पणजीत झालेल्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या समारोप समारंभात बोलताना केली. सहकार चळवळीचा कणा ताठ व मजबूत होण्यासाठी सहकारी संस्थांनी कष्टकारी व शेतकरी समाजाला मदतीचा हात देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ व गोवा राज्य सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २० नोव्हेंबर या काळात विविध भागात सहकार सप्ताह पाळण्यात आला. पणजीत सहकार संकुल इमारतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या या सहकार सप्ताहाचा समारोप कार्यक्रमाला मंत्री गोविंद गावडे हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर गोवा पर्यटन विकास महामडंळाचे अध्यक्ष व आमदार दयानंद सोपटे, सहकार निबंधक अरविंद खुटकर, डॉ. संजय सावंत देसाई, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष उदय प्रभू, उपाध्यक्ष भिसो गावस, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. जी. मांद्रेकर उपस्थित होते. 

यावेळी सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते उत्कृष्ट सहकार समाजकार्यकर्ता - दामोद नाईक (प्रियोळ, म्हार्दोळ), उत्कृष्ट अध्यक्ष - दत्तात्रय नाईक, जी. व्ही. एम. कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडा. उत्कृष्ट संस्था - भंडारी सहकारी पतसंस्था (पणजी) उत्कृष्ट सचिव - लीना शिरोडकर, नावेली विकास सेवा सोसायटी, नावेली साखळी, उत्तेजनार्थ पुरस्कार - श्री माऊली दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादीत, विर्नोडा. शिखर बॅंक कर्मचारी सहकारी पतसंस्था, पाटो - पणजी, मल्लिकार्जुन सहकारी दूध व्यावसायिक संस्था, भाटी - सांगे यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सहकार चळवळीतील समाजकार्यकर्ते भाऊ मांद्रेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तही त्यांचा सपत्नीक मंत्री गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

यावेळी पुढे बोलताना मंत्री गावडे म्हणाले की, सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलेल्या व संस्थेला यश गाठण्यास मदत करणाऱ्या सहकार समाजकार्यकर्त्यांची दखल राज्य सहकारी संघाकडून घेऊन त्यांचा गौरव केला जातो. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन व बळ मिळते.
त्यांना मायेची थाप मिळाली तर त्यांचे मनोबल वाढून अधिक वेगाने ते काम करतात. सहकारी संस्थांनी आपत्कालिन काळातही बेरोजगारांना कर्जासाठी मदतीचा हात दिल्यास अनेकजण या चळवळीत सामील होतील. सहकार क्षेत्रात संस्थांना पुढे जाण्यासाठी जे सहकार्य लाभेल ते देण्याचा प्रयत्न सरकारकडून राहील असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांनी एकजुटीने काम केल्यास संस्थेची नेहमीच भरभराटी होते व ती यशस्वी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोवा संकल्पना सुरू केली आहे त्यातून स्वतःचा व्यवसाय
सुरू करणाऱ्या तरुणांना संस्थांनी कर्ज देण्याची गरज आहे. कर्ज घेणारे हे गरीब असतात व ते वेळेवर कर्जाचे हप्ते न चुकता भरतात त्यामुळे त्यांना हमीदाराची अट न ठेवता मदत करावी. शिक्षण क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांना संस्थांनी मदतीचा हात दण्याची आवश्‍यकता आहे. काही विद्यार्थी हुशार असतात मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही अशावेळी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे, आमदार दयानंद सोपटे यांनी मत व्यक्त केले. 

या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संजय सावंत देसाई म्हणाले की, सहकार क्षेत्र डिजीटलायझेशन होण्याची गरज आहे. लोकांना सर्व सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध करून द्यायला हव्यात त्यासाठी सहकार संस्थांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करायला हवे.
संस्थांनी कर्ज उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुटसुटीत व सोपी करावी. सहकार क्षेत्रात गोवा मागे आहे त्यामुळे उत्पादनाची मार्केटिंग करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करून सहकार क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर व्हायला हवे असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या