पणजी: देशामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत असले तरी गोव्यात मात्र संसर्गाचे प्रमाण सध्या दिडशेच्या नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांमधील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या मृत्यूची सरासरी २ ते तीन आहे. चिखली - वास्को येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील मृत्यूची संख्या ६८६ वर पोहचली आहे. दिवसभरात १५० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर १५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे गोव्यातील प्रमाण (९५.७९ टक्के) देशातील प्रमाणापेक्षा अधिक आहे.
राज्यात आज दिवसभरात १२१ कोरोना रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडल्याने ही संख्या २४,३१२ वर पोहचली आहे. ३० नवे रुग्ण इस्पितळात दाखल झाले आहेत. २६४५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यातील १५० जण पोझिटिव्ह सापडले आहेत. आज नोंद झालेल्या १५० कोरोना रुग्णांच्या नोंदीनंतर आतापर्यंत राज्यातील संख्या ४७,४९१ वर पोहचली आहे.
उत्तर गोव्यातील कोविड निगा केंद्रामध्ये असलेल्या २७५ खाटांपैकी २१८ खाटा तर दक्षिण गोव्यातील केंद्रामध्ये ६० पैकी ४७ खाटा रिक्त आहेत. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण हे या केंद्रामध्ये राहण्यापेक्षा ते गृह विलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत. संसर्गाचे प्रमाण वाढू शकते यामुळे आरोग्य खात्याने सर्व ती तयारी ठेवली आहे. दरदिवशी आता दोन हजारापेक्षा अधिक कोरोना चाचणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आरोग्य खात्याने आज प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या १३१३ सक्रीय पोझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये पर्वरी आरोग्य केंद्र (१०७) व मडगाव आरोग्य केंद्र (११२) यामध्ये शंभराहून अधिक रुग्ण आहेत. पन्नासहून अधिक रुग्ण पणजी (८५), कांदोळी (७९), चिंबल (७२), कुठ्ठाळ्ली (५१), फोंडा (९६) या आरोग्य केंद्रात आहेत. उर्वरित २४ आरोग्य केंद्रामध्ये सक्रिय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ५० हून कमी आहे. रस्ता, रेल्वे किंवा विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी कोणीही प्रवासी कोरोना पोझिटिव्ह सक्रीय नाही. सर्वाधिक कमी कोरोना रुग्ण सध्या कासारवर्णे आरोग्य केंद्र भागात तर सर्वाधिक जास्त रुग्ण मडगाव आरोग्य केंद्राच्या भागात
आहेत.
कसिनो दोन कर्मचाऱ्यांना कोरोना
मांडवी नदीतील तरंगत्या कसिनोमध्ये आणखी दोन कर्मचारी कोविड पोझिटिव्ह सापडले आहेत. हे दोन्ही कर्मचारी दोन वेगवेगळ्या कसिनोचे कर्मचारी आहेत. पणजीतील एका तारांकित हॉटेलमध्ये एकजण कोविड पोझिटिव्ह सापडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पणजी व आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या विविध कसिनोच्या कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली आहे.
शांतादुर्गा मंदिर दर्शनासाठी बंद
कवळे - फोंडा येथील प्रसिद्ध असलेले शांतादुर्गा मंदिराच्या आवारात कोविड रुग्ण सापडल्याने खुले करण्यात आलेले मंदिर लोकांसाठी त्वरित बंद करण्याचा निर्णय देवस्थानच्या व्यवस्थापकीय समितीने घेतला. हे मंदिर समितीच्या पुढील निर्णयापर्यंत बंद राहणार आहे. हे मंदिर खुले झाल्याने स्थानिक तसेच पर्यटकांच्या रांगा दर्शनासाठी दरदिवशी लागत होत्या.
आठवड्यातील कोरोना स्थिती
तारीख मृत्यू नवे रुग्ण
२१ नोव्हें. ३ ११६
२२ नोव्हें. २ ७८
२३ नोव्हें. ० ७५
२४ नोव्हें. २ १६७
२५ नोव्हें. ४ १२५
२६ नोव्हें. २ १४८
२७ नोव्हें. १ १५०
आणखी वाचा:
बायोमेट्रिक मशीनमुळे त्या कार्यालयातील १३ जणांना झाला कोरोना संसर्ग -