Goa Corona Update: गोव्यात दिलासा देणारी बाब: कोरोना संसर्गित रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

ज्यात गेले सलग सहा दिवस दर दिवशी शंभरच्यावर नवे कोरोना संसर्गित रुग्ण आढळत आहेत. आजही दिवसभरात 127 नवे कोरोना संसर्गित रुग्ण आढळले.

पणजी:  राज्यात गेले सलग सहा दिवस दर दिवशी शंभरच्यावर नवे कोरोना संसर्गित रुग्ण आढळत आहेत. आजही दिवसभरात 127 नवे कोरोना संसर्गित रुग्ण आढळले. मात्र आज दिलासा देणारी बाब म्हणजे अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच आज नव्या कोरोना संसर्गित रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त झाली. आज दिवसभरात कोरोनावर उपचार घेणारे 136 व्यक्ती बरे झाले. 

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 1504 कोरोना नमुने तपासण्यात आले. त्यात 127 नवे कोरोना संसर्गित आढळले. आज दिवसभरात एका कोरोना संसर्गित  रुग्णाचे निधन झाले. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे  मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 829 वर पोचली आहे. आजच्या दिवशी  कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 1419 एवढी आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्यातील सर्वात जास्त कोरोना संसर्गित हे मडगाव (167), पणजी (157), पर्वरी (118), फोंडा (107) येथे सापडलेले आहेत. इतर आरोग्य केंद्रात सापडलेल्या कोरोना संसर्गित व्यक्तींची संख्या शंभराच्या खाली आहे.

सासष्टीत 333 कोराना रुग्ण

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी एकीकडे सरकारने सर्वत्र लसीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. पण, दुसरीकडे राज्यातील काही तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंताही वाढलेली आहे. सासष्टी तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरापर्यंत 161 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती, तर आज हा आकडा 333वर पोहचलेला आहे.  

टॅक्‍सींना डिजिटल मीटर; ‘बोले तैसा चाले’ 

सासष्टी तालुक्यात मडगाव नागरी आरोग्य केंद्र, कासावली प्राथमिक आरोग्य केंद्र, नावेली प्राथमिक आयोग्य केंद्र, चिंचिणी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लोटली प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून या सर्व आरोग्य केंद्रांत आतापर्यंत 333 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत नोंदणी केलेल्या रुग्णांची संख्या 161 होती, तर 23 मार्चपर्यंत ही संख्या 258 वर पोहचली होती, परंतु गेल्या काही दिवसाची आकडेवारी पाहिल्यास कोरोना पॉझिटिव्ह झालेले अनेक रुग्ण समोर आले आहेत.  

गोवा: 21 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष 

गोवा सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या अहवालानुसार मडगाव शहर आरोग्य केंद्रात 28 फेब्रुवारीपर्यंत 85 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. आज आकडा 161 वर पोहचला आहे. कासावली आरोग्य केंद्रात 17 कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती, तर आज हा आकडा 61 वर पोहचला आहे. नावेली आरोग्य केंद्रात फक्त दोनच कोरोनाबाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. आज तो आकडा 28 वर पोहचला आहे.  चिंचिणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23 होती. आज ती संख्या 36 वर पोहचली आहे. कुडतरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 होती, आज 19 वर पोहचली आहे. लोटली प्राथमिक आरोग्य केंद्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 होती, आज 20 वर पोहचली 
आहे.

संबंधित बातम्या