सप्टेंबर ठरतोय घातक; आठवड्यात ५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सप्टेंबरमध्ये प्रतिदिन कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण ७ वर पोहोचले आहे. ही स्थिती भयावह असून ती कमी करण्‍यासाठी सरकारकडून होत असलेल्या उपाययोजना कमी पडत आहे. या आठवड्यात ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पणजी: ‘कोविड’ महामारीचा सामना करण्यासाठी उच्च पातळीवरील सरकारी यंत्रणा दिवसरात्र राबत असली तरी कोरोना संसर्ग व मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. दरदिवशी कोरोना संसर्गाची संख्या साडेपाचेशेच्यावर पोहोचली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये प्रतिदिन कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण ७ वर पोहोचले आहे. ही स्थिती भयावह असून ती कमी करण्‍यासाठी सरकारकडून होत असलेल्या उपाययोजना कमी पडत आहे. या आठवड्यात ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यात राज्यात कोरोना संसर्ग तसेच मृत्यूचे प्रमाण बरेच वाढले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होण्याची सुरवात २२ जून २०२० पासून सुरू झाली होती. या महिन्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात ही संख्या ४१ वर पोहचली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ही संख्या जुलैपेक्षा तीन पटीने वाढली व सरकारची तारांबळ उडाली. १५ ऑगस्टला ९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात दोनदा १० जणांचा मृत्यू झाला होता व ही सर्वाधिक संख्या होती. मात्र, ८ सप्टेंबरला एकाच दिवशी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतची मृत्यूची सर्वाधिक संख्या, तर १२ सप्टेंबरला सर्वाधिक कोरोना संसर्ग झालेली ७४० ही सर्वाधिक संख्या नोंद झाली आहे. 

आजार असलेल्‍यांना धोका अधिक 
कोरोनाचा संसर्ग हा १० वर्षांखालील मुलांना तर ६० वर्षांवरील वृद्धांना होण्याचा संभव अधिक असल्याचा दावा आरोग्य खात्याने केला होता. मात्र, तो गेल्या चार महिन्यात वाढलेल्या संसर्ग तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वयोमानावरून दिसून येत आहे. ६० वर्षे कमी असलेल्या रुग्णांचे प्रमाणही ३५ ते ४० टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र, हा संसर्ग ज्यांना इतर आजार आहेत त्यांना लगेच होतो व धोकादायक असतो, हे आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांवरून दिसून आले आहे. 

साधनसुविधा उभारणीसाठी गडबड
राज्यात उभारण्यात आलेल्या कोविड निगा केंद्रातील खाटा मुबलक आहेत. अनेकांनी गृह अलगीकरणाचा मार्ग अवलंबिल्‍याने खाटा अतिरिक्त झाल्या आहेत, मात्र कोविड इस्पितळे कमी पडत आहेत. सध्या असलेली ईएसआय कोविड इस्पितळ तसेच गोमेकॉमधील चार वॉर्डही कोरोना रुग्णांनी भरलेले आहेत. खाटा नसल्याने आरोग्यमंत्र्यांची जिल्हा इस्पितळात घाई गडबडीने साधनसुविधा उभारून ते सुरू करण्याची पाळी आहे. यापूर्वी विरोधकांनी हे इस्पितळ सुरू करण्यासाठी अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले होते. 

अद्यापपर्यंत २५ हजारांना संसर्ग
आजपर्यंत २५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील सुमारे २९ हजार कोरोनामुक्त झाले आहेत. अजून सुमारे पाच हजार रुग्ण सध्या कोविड इस्पितळ, कोविड निगा केंद्रात, तर मोठ्या प्रमाणात गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. मात्र, मृत्यूचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढू लागले असून १३ सप्टेंबरपर्यंत ही संख्या २९० वर पोहोचली आहे. आरोग्य खात्यातर्फे दरदिवशी कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूसंदर्भातचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालामध्ये काही रुग्ण उपचारासाठी उशिरा इस्पितळात दाखल झाल्याचे नमूद करून सरकार आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. काही रुग्ण ८ ते १० दिवस उपचार घेतल्यानंतर, तर काही दाखल झाल्यापासून २४ तासात किंवा ४ ते ५ तासांत दगावले आहेत, असे अहवालात नमूद करून सरकारचे अपयश लपविले जात आहे. जुलै महिन्यात प्रतिदिन १.३७, ऑगस्टमध्ये प्रतिदिन ५ तर सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या