खुद्द क्रांतिवीर मार्गावर मटका व्यवसाय!

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पोलिसांच्या कारवाईमुळे खोर्लीतील मटका सध्या बंद

म्हापसा: खोर्ली भागात क्रांतिवीर मुकुंद धाकणकर मार्गावरच उसपकर जंक्शनवर मटका व्यवसाय चालत असल्याने व त्याबाबत पोलिस यंत्रणाही काहीच कारवाई करीत नसल्याने लोकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा हा अप्रत्यक्षरीत्या अवमानच केला जात आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.

म्हापशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध शासकीय यंत्रणांकडे तक्रारी केल्यानंतर व तो विषय सातत्याने लावून धरल्यानंतर म्हापसा पोलिसांनी अखेर म्हापसा बाजारपेठेतील तसेच खोर्ली भागातील बेकायदा मटका व्यवसायासंदर्भात दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. सध्या खोर्ली भागातील मटका व्यवसाय पूर्णत: बंदच आहे, तर म्हापसा बाजारपेठेतील व्यवसाय अंशत: बंद आहे.

स्थानिक नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारीही याबाबत आवाज उठवत नसल्याने अनैतिक कृत्यांबाबत लोक कसे भयभीत झालेले आहेत व भाजपची नेतेमंडळी अशा अनैतिक तथा बेकायदा कृत्यांना कसे प्रोत्साहन देत आहे, याचा प्रत्यय येतो, असा दावा यासंदर्भात आवाज उठवणारे म्हापसा पीपल्स युनियनचे जवाहरलाल शेट्ये व सुदेश तिवरेकर यांनी सांगितले. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या मुकुंद धाकणकर यांचे नाव खोर्ली भागातील एका मार्गाला देण्यात आले आहे व त्याच भागात असे बेकायदा व्यवहार चालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

म्हापसा पोलिसांनी काल शुक्रवारी छापे टाकून खोर्ली भागातील एका व्यावसायिकाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाइल फोन, मटका स्लिप इत्यादी साहित्य जप्त केले आहे. अन्य संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिस स्थानकात तक्रार केल्यानंतर छापे घालण्यापूर्वी खुद्द पोलिस स्थानकातूनच संबंधित मटका व्यावसायिकांना त्याबाबत फोनवरून पूर्वकल्पना दिली जाते व त्यामुळे ते संशयित आरोपी पलायन करण्यात यशस्वी ठरतात, असा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. पोलिसांचे अशा गुन्हेगारांशी साटेलोटे असल्याचा दावाही त्यांनी केला. खोर्ली येथे झालेल्या कारवाईवेळी पोलिस उपनिरीक्षक विराज कोरगावकर व त्यांचे अन्य तीन सहकारी पोलिस कर्मचारी होते. परंतु, खुद्द पोलिस कर्मचाऱ्यांचे संशयित गुन्हेगारांना पाठबळ लाभत असल्याचा प्रत्यय आला, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

परवा गुरुवारी म्हापसा बाजारपेठेत अशाच प्रकारे छापे टाकून पोलिसांनी एका संशयिताला अटक करण्याचे जणू नाटकच केले. एरवी मटका व्यवसायिक त्या ठिकाणी बिनधास्तपणे बसतात व तक्रार केल्यानंतरच ते तेथून कसे काय गायब होतात, हा मोठा प्रश्नच असल्याचा तक्रारदारांचा दावा आहे.

उपलब्ध माहितीनुसार, म्हापशातील  मटका व्यवसायिकांनी आज शनिवारी सकाळी तक्रारदारांसमोर जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तक्रारदारांनी त्या व्यवसायिकांना सांगितले, की एक तर मटका व्यवसायाला कायदेशीर स्वरूप द्या अन्यथा कारवाई तरी करा अशी मागणी आम्ही सरकारशी केली आहे. आणखीन किती वर्षे भीतीने व डोक्यावर टांगती तलवार कायम ठेऊन हा व्यवसाय करावा, याचा निर्णय आपणच घ्यावा, असेही तक्रारदारांनी त्यांना सुनावले आहे. त्यावर ते मटका व्यवसायिक गप्प राहिले.

संबंधित बातम्या