
Panjim Theft Case गोव्यात फोटोशूट करण्याच्या बहाण्याने कर्नाटकातील चित्रपट दिग्दर्शकाचे किमती कॅमेरे व सोनसाखळी मिळून सुमारे 5 लाखांचा ऐवज कांपाल येथील ‘स्टरबक्स’ कॅफेमधून लंपास केल्याप्रकरणी केरळच्या यासीन ऊर्फ देनू नायर (43) याला पणजी पोलिसांनी अटक केली.
विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हणजूण येथील एका हॉटेलमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. न्यायालयात उभे केले असता त्याची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित यासीन याने कर्नाटकातील चित्रपट दिग्दर्शक अविनाश बी. एस. यांना गोव्यात फोटोशूट करण्यासाठी बोलाविले. कांपाल येथील ‘स्टारबक्स’ कॅफेमध्ये त्यांची भेट निश्चित झाली.
अविनाश हे किमती कॅमेरा असलेली बॅग घेऊन तेथे आले. दोघांमध्ये फोटोशूटबाबत चर्चा सुरू असताना यासीनने अविनाश यांची सोनसाखळी हातात घालण्यासाठी घेतली. त्यानंतर अविनाश काही कामासाठी कॅफेबाहेर आले असता संशयित यासीनने त्यांची बॅग व सोनसाखळी घेऊन तेथून पलायन केले.
अविनाश कॅफेमध्ये परतले असता यासीन नायर त्या ठिकाणी नव्हता. त्याने कॅफेच्या कर्मचाऱ्यांशी चौकशी केली, मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही.
त्यानंतर अविनाश यांनी पणजी पोलिसांत तक्रार दखल केली. आपल्या बॅगेतील सुमारे 4 लाखांचे किमती कॅमेरे तसेच 1 लाखाची सोनसाखळी चोरल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.
असा बनविला चोरीचा प्लॅन: तक्रारदार अविनाश बी. एस. व संशयित यासीन यांची काही महिन्यांपूर्वी बंगळुरू येथील एका सिनेमहोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते.
त्याचवेळी अविनाश यांच्याकडे असलेले किमती कॅमेरे चोरण्याचा प्लॅन यासीनने तयार केला. त्यानुसार तो गोव्यात आला व अविनाश यांनाही फोटोशूट करण्यासाठी बोलावून संधी साधली.
तो हणजूण येथील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती पणजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. यावेळी चोरीचा ऐवजही त्याच्याकडे सापडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तपास
संशयित यासीन ऊर्फ देन नायर याबाबत तक्रारदार अविनाश यांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान, रस्त्याच्या बाहेरील काही दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली.
तसेच संशयित ‘स्टारबक्स’ कॅफेमधून पसार झालेल्या मार्गाची माहिती मिळवली. त्यानुसार मागोवा घेत संशयित नायरला जेरबंद करण्यात आले.
त्याने चोरलेली बॅग तसेच सोनसाखळीही जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलिस पथकाने ही कारवाई केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.