गोवा: हीच भाजपची संस्कृती; भाजपात नव्याने प्रवेश केलेल्यांना वरिष्ठांचा सल्ला

bjp goa.jpg
bjp goa.jpg

म्हापसा : भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पर्वरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित स्वागत सोहळ्यात पक्षप्रवेश करतेवेळीच नेते मंडळीकडून कानपिचक्या देण्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हापशात घडली. यावेळी नेत्यांनी नवागतांना पक्षाच्या शिस्तीबद्दल धडे देऊन पक्षाच्या शिस्तबद्ध कार्याबाबत बोधामृतही दिले. (Goa: This is the culture of BJP; Advice from seniors to newcomers to the BJP) 

यावेळी पर्वरी मतदारसंघातील सुमारे साठ कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीचे सदस्य संदेश मांद्रेकर, त्यांचे सहकारी कार्यकर्ते तसेच अन्य विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्याबरोबरच पर्वरी मतदारसंघ भाजयुमोची कार्यकारिणी जाहीर करणे असा दुहेरी कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री सतीश धोंड, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष समीर मांद्रेकर, पर्वरी मतदारसंघ भाजप अध्यक्ष कुंदा चोडणकर व इतरांनी पक्षशिस्तीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर, पर्वरी मतदारसंघ सरचिटणीस किशोर अस्नोडकर व अशोक शेट्ये, राज्य कार्यकारिणी सदस्य गुरुप्रसाद पावसकर, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अखिल पर्रीकर, उत्तर गोवा महिला मोर्चा अध्यक्ष गीता कदम व इतरांची उपस्थिती होती.

कुंदा चोडणकर यांनी सांगितले, आमचे केंद्र सरकार व राज्य सरकार देशासाठी चांगले काम करीत आहे. त्याचमुळे नवनवीन कार्यकर्ते आमच्या पक्षात वाढीव संख्येने प्रवेश करीत आहेत. पक्षात प्रवेश करणाऱ्यांनी शिस्त पाळावी ही अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने काही विशिष्ट बंधने पाळणे अभिप्रेत आहे. भाजपचे कार्यकर्ते असल्याने लोकांच्या नजरा त्यांच्याकडे असतात. त्यामुळे भाजपचे नाव कलंकित होईल अशी कोणतीही कृती स्वत:कडून होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायलाच हवी. केवळ पक्षप्रवेश केला म्हणूनही पुरेसे नाही, तर पक्षाचे कार्यही त्यांनी पुढे न्यायलाच हवे.

समीर मांद्रेकर म्हणाले, पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते भाजपमध्ये भाजपचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. आमच्या पूर्वीच्या नेत्यांनी पक्षाच्या यशप्राप्तीसाठी कोणता त्रास सहन केला, हेही त्यांनी जाणून घ्यावे. कठोर परिश्रम घेतल्यानंतर जी सत्ता आम्हाला मिळाली आहे ती आम्हाला राखून ठेवायची आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याची पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत असले तरी यासंदर्भातील प्रमुख जबाबदारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरच आहे, हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे, असेही मांद्रेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

युवा मोर्चा हीच भाजपची ऊर्जा : सतीश धोंड
कार्यकर्ता हाच पक्षाचा सर्वेसर्वा; जो काम करतो तोच पुढे जातो व नेता होता, हीच भाजपची संस्कृती आहे, असे नमूद करून सतीश धोंड म्हणाले, युवा मोर्चा हीच भाजपची ऊर्जा आहे. अशाच पद्धतीने काम करून पक्ष तळागाळात वाढवायला हवा. सर्वप्रथम राष्ट्रहित, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वहित ही त्रिसूत्री भाजप कार्यकर्ते पाळतात; मात्र, अन्य राजकीय पक्षांच्या बाबतीत हा क्रम उलटा असतो व ते कार्यकर्ते सर्वप्रथम स्वहित साध्य करीत असतात. भाजप हा देशाच्या संस्कृतीशी नाळ जोडणारा पक्ष असल्याने भाजपमध्ये नवीन नवीन कार्यकर्ते, नवीन नेतृत्व येत असते. कार्यकर्तेच नंतर नेते होतात, असेही धोंड म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com