Mopa Airport: दाबोळीत टॅक्सीचालक विवंचनेत 'खरी कुजबूज'

दाबोळीचा विमानतळ हा केवळ नाविक दलाशीच संबंधित राहणार आहे.
Goa Airport | Dabolim
Goa Airport | DabolimDainik Gomantak

मोपा विमानतळ कार्यरत झाल्यानंतर आमचे काय, असा सवाल दक्षिण गोव्यातील टॅक्सीचालक व इतर संबंधित व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. हे सर्वजण सध्या दाबोळी विमानतळाशी संबंधित आहेत. त्यामुळे सरकार जरी दोन्ही विमानतळ कार्यरत राहणार आहे असे सांगत असले, तरी कालांतराने दाबोळीचा विमानतळ हा केवळ नाविक दलाशीच संबंधित राहणार असल्याची कुणकूण या व्यावसायिकांना लागली आहे.

मोपा विमानतळामुळे उत्तर गोव्यातील व्यावसायिकांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, दक्षिण गोव्यातील व्यावसायिकांची झोप उडाल्याने पुढील काळात दुष्काळात तेरावा महिना की काय अशी चर्चा दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळाशी संबंधित व्यावसायिकांत सध्या सुरू आहे.

Goa Airport | Dabolim
Goa Job Scam: गोव्यात परदेशात नोकरीचे आश्वासन देऊन फसवणूकीचे सत्र सुरुच...

नामकरणात अडकला मोपा

मोपा विमानतळाचा प्रश्‍न सध्या तापला आहे, तो नामकरणाच्या नावावरून. एक गट म्हणतो भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव द्या, दुसरा गट म्हणतो जॅक सिक्वेरा यांचे नाव द्या, तर सरकार म्हणते मनोहर पर्रीकर यांचे नाव देऊ. या नामकरणात सध्या मोपा अडकला आहे.

नावाचे सगळं ठीक आहे हो, पण ज्या वेळेला मोपा विमानतळ बांधण्यासाठी घेतला आणि येथील शेतकऱ्यांना जो त्रास झाला त्यावेळेला अशातऱ्हेचा कडवा प्रतिकार त्यावेळेला इतरांकडून जाणवला नाही, जेवढा आता नामकरण विधीवरून होत आहे. वास्तविक नाव द्यायलाच हवं का, असाही एक प्रश्‍न काही गोमंतकीय विचारत आहेत, सरळ करा की नामकरण मोपा - गोवा एअरपोर्ट..! असे आम्ही नाही, काही सुज्ञ गोमंतकीयच प्रतिक्रिया देताना सांगतात.

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!

राज्यातील खनिज खाणींचे भवितव्य काही ठीक दिसत नाही. मागच्या दहा वर्षांत ज्या तऱ्हेची खेळी सत्ताधाऱ्यांनी खेळली तीच खेळी आता येत्या लोकसभा निवडणुकीचे चित्र समोर ठेवून खेळली जाते की काय असा सवाल उपस्थित होत आहे. आता तसे पाहिले तर बहुतांश खाण अवलंबितांनी आपला उद्योग व्यवसाय बदलला आहे.

आता हे खरे की पूर्वीप्रमाणे या लोकांची आमदनी होत नाही, तरीपण कसेबसे चालते ना..! सरकार काही मदत करायला तयार नाही, खाण अवलंबितांसाठी मोठा निधी उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी ठेवला गेला, त्यातील किती पैसा खाण अवलंबितांसाठी खर्च केला, असाही सवाल हे खाण अवलंबित विचारताना दिसतात. त्यामुळे सरकारची बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी काय... बरोबर ना!

सहीबहाद्दर महापौर

पणजी पालिकेचे महापौर हे मोठे पद असते. त्याला महापालिकेच्या प्रशासनाचा तसेच दैनंदिन व्यवहाराचा अनुभव असल्यास त्याचा फायदा महापालिकेला होऊ शकतो. मात्र, जर महापौर अननुभवी व दुसऱ्यावर अवलंबून असलेला असल्यास त्याचा गैरफायदा महापालिकेचे कर्मचारी घेतात. पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांना राजकारणातील कोणताही अनुभव नाही, तरीही त्यांना निवडणुकीत उतरवून मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी निवडून आणले. ते स्वतःच्या हिमतीवर कधीच निवडून आले नसते अशी केविलवाणी स्थिती आहे.

पणजी महापालिकेत रोहित यांनी आपल्या हाताखाली व फाईल्सवर नोटींग लिहिण्यासाठी एका खासगी व्यक्तीला कामाला ठेवले आहे. तो फक्त सही बहाद्दर आहे. एखाद्या कार्यक्रमात भाषण करताना त्याचा त्यातील अभ्यास नसल्याने लिहून आणलेला चिटोरा वाचण्यापलिकडे त्यांच्याकडे पर्याय नसतो. वडिलांचा आशीर्वाद असल्याने त्यांच्याविरुद्ध आवाज काढण्याची महापालिकेत कोणाची धमक नाही.

पुढील ताळगाव मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्यासाठी मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी त्यांना महापालिकेतून पुढे आणले आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांची ओळख तसेच राजकारण्याचा अनुभव याचे हे प्रशिक्षण सुरू आहे. अधिक तर वेळ हे महापौर कार्यालयात कमी व बाहेर जास्त असे समीकरण आहे.

पक्षांतर फायदेशीर..!

सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी भाजपात येण्यापूर्वी चिंबल जंक्शनवरील पुलाचे काम रखडल्यामुळे व त्याठिकाणी होणाऱ्या अपघातांबाबत आंदोलन केले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

चिंबलवासीयांनी येथील जंक्शनवर होत असलेल्या अपघातांच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा काढाल होता, त्या मोर्चाला आमदार रुडॉल्फ न आल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, परंतु आता मंगळवारी चिंबल जंक्शनवरील रखडलेल्या पुलाचे काम मार्गी लागल्याने रुडाल्फ यांना आपले पक्षांतर फायदेशीर ठरल्याचे निश्‍चित वाटले असेल.

त्याशिवाय ते पणजीतील भाजपच्या कार्यक्रमांनाही आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे सांताक्रूझमधील रखडलेली कामे किती गतीने मार्गी लावतात, हे येथील मतदार पाहात असणार हे नक्की.

लोबोंनी सोडले मौन...

मध्यंतरी, काँग्रेसच्या आमदारांनी भाजपात प्रवेश करताच या आमदारांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. हे व्हिडिओ होते, देवासमोर घेतलेल्या शपथ कार्यक्रमांचे. याविषयी आता आमदार मायकल लोबोंनी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत भाष्य करीत मौन सोडले.

आम्हाला ही शपथ घेण्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, त्यामुळे मला आश्चर्य वाटले होते व त्यामुळे मंदिरात शपथ घेताना आपल्याला हसू आले, असे ते स्पष्टीकरण देताना दिसले. जर लोबो साहेबांना हा प्रकार आश्चर्यकारक वाटत होता, तर त्यांनी तेव्हाच यास हरकत का नाही घेतली? आणि इतके दिवस स्पष्टीकरण देण्यास का उशीर लागला? कदाचित काय स्पष्टीकरण द्यावे यासाठी इतके दिवस ते विचार करत असतील, अशी चर्चा सर्वसामान्यांची चहाच्या टपरीवर मंगळवारी रंगलेली.

आता लोक सुजाण असून नेतेमंडळी काहीही सांगतील व लोक पटकन विश्वास ठेवतील असे होणार नाही. त्यामुळे नेतेमंडळींनी भविष्यात भाष्य करताना आणि आपली कुठलीही कृती ही यापुढे विचारपूर्वकच करावी, अन्यथा प्रकार असे अंगलट येतात आणि ते निस्तरताना नंतर तारेवरची कसरत करावी लागते ती अशी!

Goa Airport | Dabolim
Goa News: कोलवात 30 बेकायदा दुकानांवर ‘हातोडा’

निनावी प्रशस्तीपत्राने सन्मान

भाजपतर्फे गणेशोत्सवाच्या काळात युवा पिढीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते, त्याच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पणजीतील एका सभागृहात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री एक तास उशिरा आले.

ते आल्यावर कार्यक्रमाला सुरवात झाली व व्यासपीठावरील वक्त्यांनीही आपापली भाषणे आटोपती घेतल्यावर मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिले. त्यांच्या या भाषणात अंत्योदय सरकार, स्वयंपूर्ण सरकार व आत्मनिर्भर सरकार ही वाक्ये म्हटल्याशिवाय त्यांचे कुठलेही भाषण पूर्ण होत नाही व हे ते न विसरता त्याचा उल्लेख करतात.

त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनाही प्रशस्तीपत्र दिली जातील असे सांगण्यात आले. सभागृहात बसलेल्या सर्व स्पर्धकांनाही हायसे वाटले. प्रशस्तीपत्र वितरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू झाला. स्पर्धेतील स्पर्धकांना देण्यात आलेल्या या प्रशस्तीपत्रावर त्यांची नावेच नव्हती. काहींना वाटले चुकीने झाले असेल.

मात्र, काहींना ही प्रशस्तिपत्रे दिल्यावर सर्वच प्रशस्तीपत्रांवर नावे नव्हती. एकाने यासंदर्भात विचारले असता स्पर्धकांनी स्वतःच नावे लिहा असे सांगण्यात आले. त्यामुळे हे प्रशस्तीपत्र देऊन स्पर्धकांचा सन्मान की अपमान अशी चर्चा सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com