गोवा डेअरीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा

मतदान रविवारी : आव्हान याचिका गोवा खंडपीठाने फेटाळली
गोवा डेअरीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा
Goa Dairy Election NewsDainik Gomantak

पणजी : गोवा सहकारी दुग्ध उत्पादक संघटनेच्या (गोवा डेअरी) निवडणुकीला सांत आंद्रे दुग्ध सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सदस्य रमेश इडाथडन यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळल्याने आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत ही निवडणूक स्थगित ठेवण्याची केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळल्याने गोवा डेअरी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक ठरल्यानुसार येत्या रविवारी 19 जूनला होईल. (Goa Dairy Election News)

ही निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत गोवा खंडपीठ हस्तक्षेप करू इच्छित नाही. याचिकादाराची विनंती ग्राह्य धरल्यास निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेले नाही. त्यांची बाजू ऐकून घेणेही आवश्‍यक आहे, त्यामुळे याक्षणी निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही, असे निरीक्षण गोवा खंडपीठाने नोंदवले आहे.

निर्वाचन अधिकाऱ्यांच्या अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला इडाथडन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. निर्वाचन अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा दावा याचिकेत केला होता. दूध पुरवठा 2021 -22 या वर्षाकरिता गृहित धरण्याऐवजी 2020-21 या सालचा गृहित धरण्यात आल्यामुळे ही चूक सुधारण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही केली होती.

Goa Dairy Election News
मस्ती अंगलट! हणजूण किनारी कार फसली

दरम्यान, गोवा डेअरीचे माजी संचालक राजेश फळदेसाई व माधव सहकारी यांनी या याचिकेला हरकत घेणारे हस्तक्षेप अर्ज सादर केले होते. गोवा डेअरीची ठरलेली निवडणूक वेळेनुसार व्हावी. इडाथडन यांच्या आव्हान याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईतो त्याला स्थगिती न देण्याची विनंती करण्यात आली होती. याचिकादाराने आव्हान दिलेल्या याचिकेत या निवडणूक रिंगणात असलेल्यांना प्रतिवादी केले नाही, तसेच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे याचिकादाराला त्याची बाजू मांडण्यासाठी कायद्यात हा वाद सादर करण्यास पर्यायी व्यवस्था आहे. त्यामुळे ही याचिका विचारात न घेता फेटाळण्याची विनंती करण्यात आली होती.

गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. याचिकादार रमेश इडाथडन यांनीही अर्ज केला होता, मात्र त्यांचा अर्ज निर्वाचन अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणाने फेटाळला होता. याचिकादाराच्या संस्थेने गोवा डेअरीला नियमानुसार वर्षाला दूध पुरवठा करणे गरजेचे होते. तसा तो केला नसल्याने याचिकादार उमेदवारी अर्ज सादर करण्याला पात्र ठरत नसल्याचा निर्णय घेऊन त्यांचा अर्ज फेटाळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com