गोवा डेअरीत लुटमार व्यवस्थापनाकडूनच!

dainik gomantak
रविवार, 10 मे 2020

कुर्टी - फोंडा येथे गोवा डेअरीजवळ घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजेश फळदेसाई यांनी अनील फडते यांच्या आरोपांचे खंडन करून आपण वेळप्रसंगी अब्रूनुकसानीचा दावा अनील फडतेविरूद्ध दाखल करू असा इशारा दिला आहे.

फोंडा, 

गोवा डेअरीतील घोटाळे एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सध्या चालला असून गोवा डेअरीत प्रशासकीय कारकिर्दीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आपण केल्यानंतर आपल्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी लोकांची दिशाभूल करणारी विधाने गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक अनील फडते यांनी केली असून आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात घोटाळा झाला नसल्याचे स्पष्टीकरण माजी अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी दिले आहे.
कुर्टी - फोंडा येथे गोवा डेअरीजवळ घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजेश फळदेसाई यांनी अनील फडते यांच्या आरोपांचे खंडन करून आपण वेळप्रसंगी अब्रूनुकसानीचा दावा अनील फडतेविरूद्ध दाखल करू असा इशारा दिला आहे. यावेळी माजी संचालक शिवानंद पेडणेकर उपस्थित होते.
गोवा डेअरीत संचालक मंडळाच्या कार्यकाळात तेरा कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अनील फडते यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणाची चौकशीही सुरू आहे. डेअरीतील दूध चोरी प्रकरण, दूध पार्लर परिसरात केसकापणी, युरिया खरेदी, जास्त दरात दुधाची खरेदी अशा अनेक विषयांवर अनील फडते यांनी भाष्य केले असले तरी दूध संघाकडे भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनील फडते यांनी घेतलेले पैसे भरलेच नाही, त्याबद्दल काहीच नाही, असे राजेश फळदेसाई म्हणाले.
गोवा डेअरीतील मालाच्या खरेदीसाठी न्युट्रिशन कमिटी नेमली जाते, आणि या कमिटीच्या अहवालानुसारच संचालक मंडळाकडून कार्यवाही होते. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीत संचालक मंडळाचा संबंधच येत नाही. शेतीसाठी वापरला जाणारा युरिया पशुखाद्यासाठी वापरला गेला. दुधाची खरेदी २५ रुपयांनी शक्‍य असताना ३८ रुपयांना दूध का खरेदी करण्यात आले, गोवा डेअरीत मिल्क पार्लरमध्ये केस कापणी कशी काय केली गेली, आणि मुख्य म्हणजे दूध चोरीप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर का कारवाई केली नाही, असा सवाल राजेश फळदेसाई यांनी केला आहे.
सुरक्षा रक्षकांनी दूध चोरीप्रकरणी वाहन पकडले त्याबद्दल अभिनंदन करायला हवे, मात्र पकडलेल्या गाडीला सरकारी परवानेच नाहीत, त्यामुळे बेकायदेशीरपणे हे वाहन कसे काय चालवले गेले, त्याला जबाबदार कोण, ही गाडी गोवा डेअरीला भाडेपट्टीवर देणाऱ्या रुपेश नाईक नामक गाडीच्या मालकावर कारवाई का केली नाही, त्याला पाठीशी घालण्याचे कारण काय, कुणाचा वशिला लावला जातोय, असा सवालही राजेश फळदेसाई यांनी केला असून गोवा डेअरी ही दूध उत्पादकांची संस्था आहे. ही संस्था बुडू नये, हाच आमचा उद्देश असून प्रसंगी भ्रष्ट लोकांना हाकलण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी गोवा डेअरीसमोर दूध उत्पादक मोठे आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या