गोवा डेअरीची दूध वाहतूक सुरळीपणे सुरू: कंत्राटासाठी नवीन निविदा

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

गोवा डेअरीच्या दूधवाहक टेंपोचालकांनी अखेर नमते घेतल्याने सकाळी दुधाची वाहतूक सुरळीत झाली.

फोंडा: गोवा डेअरीच्या दूधवाहक टेंपोचालकांनी अखेर नमते घेतल्याने सकाळी दुधाची वाहतूक सुरळीत झाली. काल रात्री उशिरा दूधवाहक टेंपोचालकांनी गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यावर तोडगा काढण्यात आला. दरम्यान, गोवा डेअरीने दूध वाहक टेंपो कंत्राटासाठी निविदा जारी केली आहे.

गोवा डेअरीच्या दुधाची वाहतूक करणाऱ्या वीस ठिकाणच्या मार्गांवरील दुधाची वाहतूक बुधवारी १६ रोजी झाली नसल्याने गोवा डेअरीचे अर्धेअधिक दूध पडून राहिले होते. हे दूध उचलले न गेल्याने डेअरीला सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. गोवा डेअरीच्या प्रशासनाने दूध वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यावर भर दिल्यानंतर दूध वाहतूक करणाऱ्या टेंपोचालक कंत्राटदारांनी अखेर गोवा डेअरीकडे मिळते जुळते घेतल्याने दुधाची वाहतूक सकाळी सुरळीत झाली.

या टेंपोचालकांनी दूध वाहतुकीसाठी काढलेली निविदा रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने ती धुडकावून लावली असल्याची माहिती गोवा डेअरीतर्फे देण्यात आली. गेली चार वर्षे दूध वाहतूक कंत्राटासाठी निविदाच काढल्या नव्हत्या. मात्र, नवीन प्रशासकीय समितीने निविदा काढल्यानंतर काहीजणांनी अर्ज केले होते, त्यातील सद्यस्थितीत कुळे व कुडचडे मार्गावरील दोन टेंपोचालकांना या निविदानुसार वाहतूक करण्यास गोवा डेअरीने मंजुरी दिली आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या