दीपक ढवळीकर यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का; उपचारार्थ गोमेकॉत दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

बांबोळी इस्पितळात अतिदक्षता विभागात दीपक ढवळीकर यांना ठेवण्यात आले असून त्यांनी स्वतःच आपली प्रकृती ठीक असून चिंता करण्याचे कारण नसल्याचे कुटुंबियांना सांगितले.

फोंडा: मगो पक्षाचे अध्यक्ष तथा प्रियोळ मतदारसंघाचे माजी आमदार व माजी सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांना ह्रदयविकाराचा सौम्य धक्का जाणवून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आज (मंगळवारी) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांचे बंधू तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. 

दीपक ढवळीकर यांना दुपारी अडिचच्या सुमारास अचानक घाम येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुटुंबियांनी सुरवातीला फोंड्यातील एका खासगी इस्पितळात तातडीने उपचारासाठी दाखल केले. दीपक ढवळीकर यांचे बंधू डॉ. संदीप ढवळीकरही आपल्या इस्पितळातून फोंड्यात त्वरित पोचल्यावर त्यांनी त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवले.

फोंड्यात उपचार घेतल्यानंतर त्यांना लगेच बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले. ह्रदयविकाराची शक्‍यता असल्याने बांबोळी इस्पितळात त्यांच्यावर काही तपासण्यात करण्यात आल्या असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्‍टरांनी दिली.

बांबोळी इस्पितळात अतिदक्षता विभागात दीपक ढवळीकर यांना ठेवण्यात आले असून त्यांनी स्वतःच आपली प्रकृती ठीक असून चिंता करण्याचे कारण नसल्याचे कुटुंबियांना सांगितले.

दीपक ढवळीकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना दोनापावल येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते. पाच दिवसांपूर्वीच ते कोरोनातून मुक्त झाल्यावर घरी परतले होते व घरीच विश्रांती घेत होते. मात्र, दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी धावपळ केली. 

दीपक ढवळीकर अचानकपणे आजारी पडल्याने त्यांना बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती सबंध गोव्यात पसरल्यावर ढवळीकर यांच्या घरी तसेच निकटवर्तीय व मगो पदाधिकाऱ्यांकडे मगो समर्थक तथा ढवळीकर यांच्या स्नेही, हितचिंतकांनी फोन करून विचारपूस करायला सुरवात केली. 

दरम्यान, दीपक ढवळीकर यांची प्रकृती ठीक असून चिंता करण्यासारखी कोणतीच स्थिती नसल्याचे त्यांचे बंधू तथा मगोचे नेते व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. दीपक ढवळीकर यांनी स्वतःच बोलून आपण ठीक असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे चिंतेचे कोणतेच कारण नाही, तरीपण सुरक्षेमुळे अजून दोन दिवस इस्पितळात ठेवून आरोग्यविषयक पुढील तपासण्या करण्यात येतील, अशी माहिती ढवळीकर कुटुंबियांकडून देण्यात आली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या