कवळेतील व्यावसायिकांची अर्थसाह्याची मागणी

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

कोरोनाची महामारी आणि लॉकडाऊन यामुळे विक्रेते व व्यापारी वर्गाची बिघडलेली घडी अजून बसलेली नाही. रोजीरोटी चालवणारा व्यवसायच ठप्प झाला असून कुटुंबाला खायला घालायचे काय, असा सवाल करण्यात येत आहे.

फोंडा: कोरोनाची महामारी आणि लॉकडाऊन यामुळे विक्रेते व व्यापारी वर्गाची बिघडलेली घडी अजून बसलेली नाही. रोजीरोटी चालवणारा व्यवसायच ठप्प झाला असून कुटुंबाला खायला घालायचे काय, असा सवाल करण्यात येत आहे. फोंडा तालुक्‍यातील मंदिर परिसरात विविध व्यवसाय करून संसार चालवणाऱ्यांवर तर मोठी आफत आली असून कवळे भागातील व्यावसायिकांनी काल कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या अडचणीच्या वेळेला निदान आर्थिक मदत करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. 

फोंडा तालुक्‍यातील विविध देवालये खुली झाली असली तरी कोरोनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांची संख्या काही वाढलेली नाही. नियम पाळूनच सध्या फोंडा भागातील बहुतांश देवालयात भाविकांना प्रवेश दिला जातो. त्यातच फुले व इतर वस्तू आणण्यावर काही देवालयात निर्बंध आहेत. भाविकांची आधीच संख्या रोडावलेली असताना निर्बंधांमुळे मंदिर परिसरातील व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. काही व्यावसायिक तर केवळ या व्यवसायावरच कुटुंब चालवत असून गेले सहा महिने कसेबसे ढकलले, आता पुढे काय, असा सवाल करण्यात येत आहे. 

कवळे पंचायत क्षेत्रातील शांतादुर्गा तसेच इतर देवस्थानांसमोरील फुल विक्रेते, गाडेवाले, दुकानदार, रिक्षावाले व इतर व्यावसायिक आमदनीच नसल्याने हताश झाले असून आता मुख्यमंत्र्यांनीच आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. 

कवळे पंचायतक्षेत्रातील शांतादुर्गा देवस्थानात तर भाविकांची मोठी गर्दी असायची. नित्य कार्यक्रम व उत्सवांवेळीही भाविकांच्या राबत्यामुळे मंदिर परिसरातील गाडेवाले, दुकानदार, फुलविक्रेते तसेच रिक्षा व अन्य व्यावसायिकांना गिऱ्हाईक मिळायचे. पण आता कोरोनाच्या महामारीमुळे सुरुवातीला लॉकडाऊन आणि आता निर्बंधांमुळे या व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कुटुंब चालवणे शक्‍य नसल्याने आता पुढे काय, असा सवाल या विक्रेत्यांकडून केला जात आहे. 

नोकरी नसल्याने बरेच लोक मंदिर पर्यटनावर गुजराण करतात. मंदिरात येणारे भाविक व पर्यटकांमुळे व्यवसाय चालतो. तुटपुंजी का होईना आमदनी होत असल्याने हे लोक आपली रोजीरोटी चालवण्याबरोबरच मुलांचे शिक्षण, आजारपण आदींवर खर्च करायचे. पण आता ते शक्‍यच नाही. कुणाकडे हात पसरण्याची परिस्थितीही नाही, त्यामुळे सरकारनेच आमच्याकडे लक्ष द्यायला हवे, असे या लोकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या