जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष - उपाध्यक्षांची निवडणूक ८ जानेवारीला ; दावेदारांमुळे भाजपसमोर पेच

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर अध्यक्ष - उपाध्यक्षाची निवडणूक त्वरित न घेता ती नाताळ तसेच नववर्षानिमित्त पुढे ढकलण्यात आली होती.

पणजी  :  जिल्हा पंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर अध्यक्ष - उपाध्यक्षाची निवडणूक त्वरित न घेता ती नाताळ तसेच नववर्षानिमित्त पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक आता नववर्षात ८ जानेवारीला घेण्यात येणार आहे. जिल्हा पंचायतीवर भाजपचे निर्विवाद बहुमत असले, तरी या पदांसाठी अनेकांनी दावे केले आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे.

लेल्या माहितीनुसार उत्तर तसेच दक्षिण जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकाच दिवशी बैठक होणार आहे. उत्तर जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड पणजीतील जिल्हा पंचायत कार्यालयात तर दक्षिण जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. जिल्हा पंचायत सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक नववर्षातच घेतली जावी, असा प्रस्ताव खात्यामार्फत पाठवून त्यानंतरच तारीख ठरविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे आता ही निवडणूक ८ तारखेला निश्‍चित करण्यात आली आहे. उत्तरेत अध्यक्षपद व दक्षिणेतील उपाध्यक्ष सर्वसाधारण, तर उत्तरेतील उपाध्यक्षपद व दक्षिणेतील अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या पदासाठी पुरुष सदस्यांबरोबरच महिलांमध्येही चुरस व चढाओढ सुरू झाली आहे. 

झुकते माप कुणाला?

जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने उत्तर व दक्षिण जिल्ह्यात ३३ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. त्यामुळे अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठी भाजप प्रदेश समितीची बैठकीत नावे निश्‍चित होणार आहेत. विरोधकांकडून विरोध करण्यासाठी या पदासाठी उमेदवारी अर्ज सादर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिनविरोध निवड होऊ नये, यासाठीही विरोधक अर्ज सादर करू शकतात. तिसवाडी, फोंडा, वाळपईत भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांनी निवडून येत बाजी मारल्याने काही नवनिर्वाचित सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहे. यावेळी भाजप प्रदेश समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनुभवी व लोकांशी दांडगा संपर्क असलेल्यांच्या नावाचा विचार केला जाणार आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांनी व मंत्र्यांनी आपापल्या तालुक्यातील जिल्हा पंचायत सदस्यांना निवडून आणण्यात महत्त्‍वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या जिल्हा पंचायत सदस्यांनाही झुकते माप समितीकडून मिळू शकते. 

मांद्रे भाजप मंडळाला समज

मांद्रे मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर जाहीरपणे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न मांद्रे मंडळ समितीच्या अंगलट आल्यात जमा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज पत्रकार परिषद घेणाऱ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि पुन्हा असे करू नये, अशी समज दिली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केल्यानंतर पार्सेकर यांनी उघडपणे त्यांना आव्हान दिले होते, पक्षांतर्गत मतभेद त्यामुळे उघड झाले होते. या साऱ्याची दखल घेत तानावडे यांनी यापुढे मंडळ समितीला कोणाकडून सहकार्य मिळत नसेल किंवा कुणी पक्षाच्या विरोधात वावरत असेल तर त्याची माहिती आपणास द्यावी, असे सांगितले आहे. यापुढे पक्षातील अंतर्गत बाबींवर पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्षांपर्यंत माहिती पोचण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी तंबीही तानावडे यांनी दिली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत विजयी अपक्ष उमेदवारांसमवेत पार्सेकर यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. त्यानंतर भाजपच्या मांद्रे मंडळ समितीने पत्रकार परिषद घेत भाजप उमेदवारांच्या पराभवाला पार्सेकर यांना जबाबदार ठरवले होते.

"जिल्हा पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अजून कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. ही निवडणूक पुढील आठवड्यात होऊ शकते. काही सदस्यांची यादी तयार केली गेली आहे त्यांच्या नावाबाबत समितीच्या तसेच ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच त्यावर निर्णय होणार आहे. पक्षाने घेतलेला निर्णय हा भाजप जिल्हा पंचायत सदस्यांना बंधनकारक असणार आहे."
- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्‍यक्ष

महिलाही शर्यतीत..!
उत्तर गोव्यामध्ये अनेक जिल्हा पंचायत सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी तयारी दाखविली आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित व दोन वेळेपेक्षा अधिकवेळा निवडून आलेल्यांचा समावेश आहे. उत्तरेत उपाध्यक्ष महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे महिला सदस्यांना संधी उपलब्ध झाली आहे. दक्षिणेत अध्यक्षपदावर ज्येष्ठ व अनुभवी जिल्हा पंचायत सदस्याची निवड अपेक्षित आहे. उपाध्यक्षपदासाठी दोनवेळा निवडून आलेल्या सदस्यांमध्ये चढाओढ आहे. 
 

संबंधित बातम्या