राज्यात जिल्‍हा पंचायत, पालिका निवडणुका लवकरच; उमेदवारांच्‍या आशा पल्लवीत

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा केल्याने राज्यात जिल्हा पंचायत आणि पालिका मंडळाच्या निवडणुका घेता येऊ शकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पणजी: केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा केल्याने राज्यात जिल्हा पंचायत आणि पालिका मंडळाच्या निवडणुका घेता येऊ शकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या म्हापशात होणार आहे. त्या बैठकीत याविषयी चर्चा होणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकारने कोविड टाळेबंदी लागू केल्याने राज्य सरकारने जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलली होती. आता जिल्हा पंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. राज्यातील पालिकांच्या निवडणुकाही पुढील महिन्यात घ्याव्या लागणार आहेत. सरकार पालिका मंडळाना मुदतवाढ देणार की, पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाने आकाराने मोठ्या असलेल्या बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे कोविड महामारीच्या काळातही नियम, अटींचे पालन करून निवडणूक घेता येते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. देशातील निवडणुकींसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम मानला जातो. त्याच आयोगाने आता निवडणूक कशी घेता येईल, याची वाट दाखवल्याने जिल्हा पंचायत व पालिका मंडळ निवडणुका घेण्याचा विचार सत्ताधारी भाजपमध्ये बळावू शकतो.

उत्तर व दक्षिण गोव्‍यातील दोन जिल्‍हा पंचायतींच्‍या ५० मतदारसंघातील १९ सर्वसाधारण, तर ३१ आरक्षित मतदारसंघ जाहीर केले होते. या आरक्षित मतदारसंघात १४ इतर मागासवर्गीय, ६ अनुसूचित जमाती व १ अनुसूचित जमाती व १० महिलांसाठी राखीव ठेवले होते. महिलांसाठी एकूण १७ मतदारसंघ आरक्षित ठेवले होते. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली झाली असताना अचानक कोरोना महामारीचे संकट आले आले आणि उमेदवारांच्‍या मेहनतीवर पाणी फिरले. निवडणूक जाहीर झाल्‍यास आता तब्‍बल सहा महिन्‍यांचा कालावधी लोटला. तेव्‍हाची व आताची परिस्‍थिती वेगळी असल्‍याने इच्छूक उमेदवारांना आता पहिल्‍यापासून प्रयत्‍न सुरू करावे लागणार आहेत.

काही उमेदवारांचे भवितव्‍य टांगणीला?
जिल्‍हा पंचायत निवडणूक प्रचार अंतिम टप्‍प्‍यात असताना ऐनवेळी निवडणूक रद्द झाली आणि अनेक उमेदवारांची गोची झाली. एका दोन म्‍हणता तब्‍बल सहा महिने लोटले. उमेदवारांसह मतदारही निवडणूक होणार कधी? असा प्रश्‍‍न विचारत होते. मात्र, सर्वकाही केंद्राच्‍या निर्णयावर अवलंबून असल्‍याने गप्‍प बसल्‍याशिवाय तरणोपाय नव्‍हता. आता बिहारची निवडणूक जाहीर केल्‍यामुळे उमेदवार पुन्‍हा नव्‍याने सक्रिय होतील, यात शंका नाही. तसेच पालिका निवडणुकाही रंगणार आहेत. या दोन्‍ही निवडणुका निवडणूक आयोग कधी जाहीर करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभाही निवडणुकाही लवकर होण्‍याचे संकेत दिसत असल्‍याचेही संकेत राजकीय तज्‍ज्ञांकडून व्‍यक्‍त केले जात आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या