कोरोनामुक्त झालेल्यांबद्दल संकुचित दृष्टी का?

विलास ओहाळ
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

एप्रिल आणि मे महिन्यात जे कोरोनामुक्त होऊन घरी परतत होते, तेव्हा तेथील लोक त्यांचे दूर उभे राहून स्वागत करायचे. मात्र, आता हे चित्र बदलले, ज्या सोसायटीतील लोक कोरोनामुक्त होऊन येतात त्यांचे स्वागत करणे सोडाच, पण त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.

पणजी: एप्रिल आणि मे महिन्यात जे कोरोनामुक्त होऊन घरी परतत होते, तेव्हा तेथील लोक त्यांचे दूर उभे राहून स्वागत करायचे. मात्र, आता हे चित्र बदलले, ज्या सोसायटीतील लोक कोरोनामुक्त होऊन येतात त्यांचे स्वागत करणे सोडाच, पण त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.

मार्च महिन्यात कोरोनामुळे संचारबंदी त्यानंतर टाळेबंदी लागू झाली. जे रुग्ण रुग्णालयातून उपचार घेऊन बरे होत होते, त्यांचे स्वागत करणारी दृष्य दूरचित्रवाहिनीवर झळकत होती. आता कोरोनाचा एवढा फैलाव झाला आहे की कोण बरा झाला आणि कोणाला कोरोना झाला याचीही दखल घेण्यात लोकांना फारच स्वारस्य राहिले नाही.

ज्या ठिकाणी सोसायट्या आहेत, त्या ठिकाणी सध्या विचित्र चित्र पाहायला मिळू लागले आहे. साकेत मिश्रा (नाव बदलले आहे) मूळ राहणार आसामचे पण नोकरी औषध कंपनीत असल्यामुळे आता ते सध्या ताळगावात आपल्या कुटुंबासह एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहतात. त्यांची पत्नी सुधा आणि मुलगा संकेत (दोघांची नावे बदललेली आहेत.) असे हे तीन डोक्यांचे कुटुंब. सुधा या हाताने दिव्यांग असल्या तरी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्या आसामच्या हस्तकलेच्या वस्तू विक्रीचा व्यवसाय करतात. मुलगा संकेतही १२ वी सायन्स उत्तीर्ण झाला असून, तो सध्या स्वतःचा अॅप निर्मितीच्या कामात व्यस्त आहे. 

ऑगस्टच्या सुरुवातीला साकेत मिश्रा हे कोरोनामुळे आजारी झाले. त्यानंतर त्यांची पत्नी व मुलांची लक्षणे पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तिघांना कोरोना झाल्याची वार्ता सोसायटीत वाऱ्यासारखी पसरली. इतरवेळी सोसायटीतील घरी ये-जा करणाऱ्या लोकांनी १४ दिवसांत एकदाही विचारपूस केली नाही. मडगाव येथे अलगीकरणात उपचार घेऊन घरी परतल्यानंतर सोसायटीतील आजूबाजूच्या लोकांनी दरवाजे लावून घेतले. सुरुवातीला नाही पण पाच- सहा दिवसांनीही मिश्रा यांना त्याच प्रकारचा अनुभव आला. 

या तिन्ही कुटुंबातील बाप-लेकांनी प्लाझ्मा दान केला आहे. साकेत मिश्रा यांनी आपल्या कंपनीतील २० जणांना प्लाझ्मा देण्यासाठी प्रोत्साहित केले. अठरा वर्षीय संकेतच्या प्लाझ्मा दानाची स्वतः आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दखल घेतली आहे. आजही या कुटुंबाकडे आजूबाजूच्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, याची जाणीव मिश्रा यांना आणि त्यांच्या कुटुंबाला वारंवार होते, हे असं का घडतं? असा प्रश्न मिश्रा यांना सतावत आहे.

गावात माणुसकी जिवंत!
कोरोनाने केवळ शहरेच नाही, तर ग्रामीण भागही आपल्या कवेत घेतला आहे. ग्रामीण भागातील लोक कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केले, तर मोबाईलवरून त्यांची विचारपूस करतात. घरी बरा होऊन परतला असेल, तर घराकडे जाऊन दूर उभे राहून आस्थेने विचारपूस करतात. त्यामुळे यातून ग्रामीण भागात आत्मियता, आपुलकी असाणाऱ्या माणुसकीचे दर्शन घडते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या