जिल्हा पंचायत निवडणुकीत कांदेपोहे..!

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेण्यासंबंधी सरकार आग्रही असल्याने या निवडणुका घ्याच, पण त्यात आमिषे देण्याचा आणि दाखवण्याचा प्रकार मात्र होता कामा नये. गोव्यातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या निवडणुकीसंबंधी कडक नियम घालूनच ही निवडणूक घ्यावी,

फोंडा : जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेण्यासंबंधी सरकार आग्रही असल्याने या निवडणुका घ्याच, पण त्यात आमिषे देण्याचा आणि दाखवण्याचा प्रकार मात्र होता कामा नये. गोव्यातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या निवडणुकीसंबंधी कडक नियम घालूनच ही निवडणूक घ्यावी, अशी मागणी मगो पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या दक्षिण गोव्यात एका राजकीय पक्षाच्या बैठकीत पोहे, गूळ, कांदे आणि इतर जिन्नस वाटण्याचे ठरवण्यात आल्याने एकापरीने हे आमिषच असल्याचा आरोप करून असा प्रकार झाला तर तो लोकशाहीला मारक असल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. 

बांदोडा पंचायतीत  (शनिवारी) झालेल्या पत्रकार परिषदेला सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, माजी पंच सूर्यकांत नाईक तसेच पंच उषा नाईक आदी उपस्थित होत्या. कोरोनामुळे रद्द झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांत आणखी प्रचाराला आणि आमिषे देण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक आयुक्तांनी संधी देऊ नये, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
राज्यात सध्या बजबजपुरी माजली असून मगो पक्षाचे कार्यकर्ते आणि सदस्य जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सज्ज आहे. मगो पक्ष हाच जनतेसाठी पर्याय ठरणार असून निवडणूक आयोगाने ही निवडणूक घेताना कडक नियमांचे पालन व्हावे यासाठी खबरदारी घ्यावी, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.  

गोव्याची सध्या नाचक्की चाललीच आहे, कोरोनाचा धोका हिवाळ्यात अधिक संभवू शकतो म्हणून सनबर्नसारख्या पार्ट्या आयोजित करून लोकांच्या आरोग्याशी खेळू नका, असे सांगून नरकासूर नाचवणे आधी बंद करा, असेही सुदिन ढवळीकर यांनी सूचवले. राज्यातील पंचायती सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र पंचायत संचालनालय सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून पंचायतींमधील विकासकामेही ठप्प झाली आहेत. पंचायतींना सबळ करण्याऐवजी अपंग करण्याचा प्रकार सरकार पातळीवर होत आहे. पंचायतींना विकासकामांसाठी अजून अनुदान मिळालेले नाही, औद्योगिक वसाहतींचा महसूल संबंधित पंचायतींना देण्यात आलेला नाही, "फोर्टिन फायनान्स'' योजनेचे पैसे इतर कामांना वापरण्याचा सल्ला देण्यात येत असून सरपंच पंचांनी जाब विचारल्यावर पंचायतमंत्री हात वर करून मोकळे होत आहेत.

गोवा हागणदारीमुक्त असल्याचे मुख्यमंत्री जाहीर करून जनतेची आणि केंद्र सरकारची दिशाभूल करीत असून पैसे भरलेल्या गरजूंना अजून शौचालय उपलब्ध केले जात नाही. आपण मंत्रीपदी असताना कधीच भेदभाव केला नाही. शौचालयांसाठी मालकांकडून ना हरकत दाखला मिळाला नसल्याने मडकई मतदारसंघातील काही लोक या योजनेपासून दूर असले तरी बहुतांश लोकांनी आपण मंत्रीपदी असताना या सुविधेचा लाभ घेतला आहे. पण आज पैसे भरूनही सुविधा मिळत नाही. आता लोकांनीच काय ते ठरवायला हवे, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.

जिल्हा पंचायत निवडणुकीत कांदेपोहे..!
जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदारांना आकृष्ट करण्यासाठी दक्षिण गोव्यात एका राजकीय पक्षाने पोहे, गूळ, कांदे आणि इतर साहित्य घरोघर पोचवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी हा कांदेपोह्यांचा कार्यक्रम आयोजित करून लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार होत असून मतदारांनी मते देताना मात्र आपल्याला पाहिजे त्यालाच द्यावीत, असे सुदिन ढवळीकर यांनी सूचवले.

दीपावलीनिमित्त मैदानावर धार्मिक विधी 
बांदोडा पंचायतीतर्फे दरवर्षी बांदोडा पंचायतीतर्फे दिवाळीला पाडव्यादिनी भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे धोका असल्याने तसेच माधवराव ढवळीकर ट्रस्टचे अध्यक्ष मोहन ढवळीकर यांचे निधन झाल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून धार्मिक विधी तसेच पोह्यांचा कार्यक्रम होईल, असे सुदिन ढवळीकर यांनी जाहीर केले व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या