Goa Election Result 2021: सत्ताधारी भाजपच्या गटात आत्मविश्वास निर्माण करणारा आणि विरोधकांना चिंतेत टाकणारा निकाल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

राज्यभरात विरोधक एकवटत असल्याचे चित्र असतानाच झालेल्या सहा पालिकांच्या आणि पणजी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवारांनी आपला विजय नोंदवला.

पणजी : राज्यभरात विरोधक एकवटत असल्याचे चित्र असतानाच झालेल्या सहा पालिकांच्या आणि पणजी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवारांनी आपला विजय नोंदवला. कुंकळ्ळी पालिका आणि साखळी पालिका पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी 110 पैकी 85 जागा जिंकून भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीनंतरची घोडदौड कायम ठेवली आहे. सत्ताधारी भाजपच्या गोटात आत्मविश्वास निर्माण करणारा आणि विरोधकांना चिंतेत टाकणारा, असा हा निकाल आहे.(Goa Election Result 2021 We have won the 2021 municipal elections. We will win the next assembly elections with an absolute majority)

"आम्ही 2021 च्या नगरपालिका निवडणुका जिंकल्या आहेत. पुढील विधानसभा निवडणुकाही आम्ही पूर्ण बहुमताने जिंकू," असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वैयक्तिकरीत्या विरोधकांकडून लक्ष्य केले जात होते. त्यांच्या नेतृत्वावर शंका घेणारी वक्तव्ये काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डकडून हेतूतः केली जात होती. मात्र, या साऱ्याला पुरून उरत भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांनी एकहाती विजय खेचून आणले आणि मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्र्यांनी मात्र या यशाचे श्रेय भाजपचे संघटन आणि संघटन कौशल्य असलेल्या राष्ट्रीय व स्थानिक नेतृत्वाला दिले.

पालिका निवडणुकीतील आरक्षणावरून गोवा फॉरवर्ड व काँग्रेसचे कार्यकर्ते आधी उच्च न्यायालयात गेले होते. नंतर सर्वोच्च न्यायालयातही कॅव्हेट अर्ज सादर करून ते झुंजले. तेथे मिळालेल्या यशामुळे सरकार बॅकफूटवर जाते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे सरकार जणू अल्पमतातच आले, अशी वक्तव्ये विरोधी नेत्यांकडून केली जात होती. सर्व पालिकांची मतमोजणी एकत्रित न घेतल्यास न्यायालयात जाणार, असे सरकारला धमकावण्यातही आले.

Goa Municipal Election Result 2021: भाजप उमेदवारांनी विरोधकांचा उडवला धुव्वा 

पंतप्रधानांकडून ट्विटद्वारे दखल

राज्यातील पालिका व महापालिका निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या विजयाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे भाजपला सातत्याने पाठींबा देणाऱ्या गोव्याचे आभार. या निवडणूक निकालाने आमच्या सरकारच्या विकासाच्या धोरणाला जनतेचा असलेला पाठींबा दिसतो. जनतेपर्यंत जाऊन प्रचार केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन. या ट्विटबद्दल पंतप्रधानांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ट्विटरवरूनच आभार मानले आहेत. जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी पक्ष कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्‍यांनी दिली आहे.

 

संबंधित बातम्या