Goa Elections Flashback: Know all about Luizinho Faleiro and Manohar Parrikar
Goa Elections Flashback: Know all about Luizinho Faleiro and Manohar Parrikar Dainik Gomantak

फालेरो मनोहर पर्रीकर यांच्याप्रमाणेच दीर्घकाल चर्चेत असलेले व्यक्तिमत्व

माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ आमदार लुईझिन फालेरो तृणमूलवासी होणार असल्याचे वृत्त गोव्यात पसरले आहे. फालेरो यांनी एका विधानसभा निवडणुकीत पराभव चाखला, तर कै. पर्रीकर यांच्या पदरी सतत यश आले होते.

फालेरो (LUIZINHO FALERIO) यांची राजकीय कारकिर्द कै. पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यापेक्षा जास्त. 2007 ते 2012 दरम्यान ती खंडितही झालेली. फालेरो यांनी एका विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) पराभव चाखला, तर कै. पर्रीकर यांच्या पदरी सतत यश आले. दोघांचा स्वभाव पूर्णपणे मिळताजुळता नसला, तरी दोघांचे एकमेकांशी चांगले जुळतही होते. दोघांनीही एकमेकांवर वैयक्तिक आगपाखड करण्याची राजकीय (Goa Politics) खेळी प्रखरपणे खेळलेली दिसली नाही.

प्रसंगी एकमेकांना सांभाळूनही घेतले, निवडणुकीवेळी दोघेही एकामेकांच्या पक्षाच्या धोरणावर मात्र सपाटून टीका करायचे. आणखी एक साम्य म्हणजे दोघेही उच्च शिक्षीत, कै. पर्रीकर अभियंते, तर फालेरो हे वकील असून त्यांनी वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर शिक्षणही घेतलेले आहे. कै. पर्रीकर यांची उणीव 2022 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त भाजपलाच नव्हे, गोव्यातील मतदारांनाही भासणार आहे. या पार्श्वभूमीवर फालेरो यांच्या हाती निवडणुकीची महत्त्वाची सूत्रे देऊन त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. पण, नव्या राजकीय हालचाली पाहाता फालेरो कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता गडद झाली आहे.

Goa Elections Flashback: Know all about Luizinho Faleiro and Manohar Parrikar
Goa Politics: फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर काय...

त्यांना काँग्रेसने वेळीच चुचकारले असते, तर त्या पक्षाला नक्की काय लाभ झाला असता, असा प्रश्न उपस्थित होतो. अर्थात त्यांच्यामुळे सासष्टी, मुरगाव मतदारसंघात काँग्रेसला थोडासा फायदा होऊ शकला असता. परंतु, विरोधकांची भक्कम भिंत भाजपविरुद्ध उभी करणे त्यांना जमले असते का? अलीकडील पवित्रा पाहाता काँग्रेस ‘एकला चलो रे’ मंत्राचा जप करीत पुन्हा 2017 च्या वाटेने जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने ‘एकला चलो रे’ केल्यास तिसरी आघाडी निवडणुकीत दिसेल, यात आता तिळमात्रही शंका नाही.

त्याचे परिणाम म्हणून पुन्हा एकदा गोव्याच्या माथी त्रिशंकू विधानसभा येण्याची भीती आहे. थोड्याफार फरकाने राज्यात 2017 निवडणुकीनंतर जी स्थिती होती, तीच काँग्रेस पक्षात 2022 नंतर पाहायला मिळू शकते. अर्थात केंद्रात भाजप सरकार असल्यामुळे त्याचा फायदाही भाजपलाच मिळणार आहे. तशी मागील पाच वर्षांत आमदार म्हणून फालेरो यांची पक्ष पातळीवर विशेष कामगिरी दिसलीच नाही. वयाच्या सत्तरीत पोहोचल्यामुळे ते निवृत्त होणार आणि आपल्या मोठ्या मुलाला विधानसभा निवडणुकीत उतरवतील, असे वाटत होते. पण, अखेर त्यांनी आपल्याला हवे तेच साध्य केल्याचे दिसते.

फालेरो यांनी गेल्या पाच - सहा महिन्यांपासून स्वारस्य नाही, असे म्हणत प्रदेश काँग्रेसाध्यक्ष आपल्याकडे यावे यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, हे आता लपून राहिलेले नाही. मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसने ज्या समित्या नियुक्त केल्या, त्याबद्दल ते समाधानी नसावेत, नाहीतर तृणमूल काँग्रेसशी संधान बांधण्याची भाषा अप्रत्यक्षरीत्या त्यांनी केली नसती. त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचे जाहीर भाष्य केले नसते.

Goa Elections Flashback: Know all about Luizinho Faleiro and Manohar Parrikar
Goa Politics: गिरीश चोडणकर आभासी दुनियेत

आता तृणमूलमध्ये जाऊन कोणते राजकारण फालेरो करू इच्छितात? ते भाजपमधील किमान पाच - सात असंतुष्ट कॅथोलिक आमदार काँग्रेसमध्ये आणण्याची शक्यता मध्यंतरी चर्चेत होती. त्यात प्रामुख्याने सासष्टी, तिसवाडी, मुरगाव, बार्देशमधील काही आमदार, कार्यकर्त्यांचा गट होता. फालेरो यांना विरोध करणारा एक गट काँग्रेसमध्ये असल्यामुळे फालेरोंसोबत काँग्रेसचे काही मोहरे तृणमूल काँग्रेसमध्येही जाऊ शकतात. भाजपात कुटुंबराजचे प्रस्थ वाढल्यास अगदी पर्रीकर स्टाईलने ते आक्रमक होऊ शकतात. मागच्या निवडणुकीतील चुका सुधारल्यास गोवा फॉरवर्डला बरोबर घेऊन का जाऊ नये? फालेरो यांचे प्रस्थ काँग्रेसमध्ये वाढल्यामुळे अपक्ष आमदारांसाठी, गोवा फॉरवर्डच्या युतीसाठी तिसरा पर्याय म्हणून तृणमूल काँग्रेसचे व्यासपीठ खुले झाल्याचे वाटत होते, त्या समजालाही आता फालेरोंच्या कथित तृणमूल काँग्रेस प्रवेशानाने ‘खो’ मिळाला आहे.

तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेबरोबर गोव्यातील राजकारण गुंतागुंतीचे बनणार असल्यामुळे गोंधळलेल्या राजकारणाचा लाभ शिस्तबद्ध नियोजनातून, म. गो. भाजप युतीद्वारे भाजपच उठवण्याची चिन्हे आहेत, हे काँग्रेसच्या आता तरी लक्षात आले असावे का? राजकारणाच्या गुंतागुंतीतून, फोडाफोडीचे राजकारण, मतदारांतील गोंधळ वाढण्याची शक्यता असल्यामुळे भाजपसमोर निवडणुका लवकर घेणे हा पर्याय असेल, ते गणित भाजपला लाभदायक का ठरू नये?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com