एल्‍विस गोम्स यांनी ‘आप’चे राज्य प्रमुखपद सोडले

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

'राज्य निमंत्रक म्हणून मर्यादित साधनांसह मी पक्षासाठी कार्य केले. आता जबाबदाऱ्या वाटून घेऊन पक्षाचे कार्य पुढे न्यायला हवे म्हणून मी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला, असे गोम्स यांनी सांगितले. 

मडगाव: आम आदमी पार्टीचे ( आप) राज्य निमंत्रक एल्‍विस गोम्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राहुल म्हांबरे हे राज्य निमंत्रकपदाची धुरा सांभाळणार आहेत. कुंकळ्ळी मतदारसंघात लक्ष केंद्रीत करण्यासाठी तसेच पक्षाचे कार्य तळागाळात नेण्यासाठी आपण पद सोडल्याचे गोम्स यांनी स्पष्ट केले आहे. 

‘आप’चे काम सुरूच ठेवणार आहे. कुंकळ्ळीसह इतर काही मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य निमंत्रकपदाचा मी त्याग केला आहे. प्रामुख्याने कुंकळ्ळी मतदारसंघावर मी लक्ष केंद्रीत करणार आहे’, असे गोम्स यांनी सांगितले. 

‘मी पक्षाचे राज्य निमंत्रकपद जवळपास चार वर्षे सांभाळले. ‘आप’ आता राजकीय पक्ष म्हणून राज्यात बऱ्यापैकी स्थिरावला आहे. आता लोकांमध्ये जाऊन लोकांना पक्षाकडे आकृष्ट करण्याचे काम हाती घ्यायला हवे. राज्य निमंत्रक म्हणून मर्यादित साधनांसह मी पक्षासाठी कार्य केले. आता जबाबदाऱ्या वाटून घेऊन पक्षाचे कार्य पुढे न्यायला हवे म्हणून मी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला, असे गोम्स यांनी सांगितले. दिल्लीत ‘आप’ सरकारने शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य, वीज आदी क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे उदाहरण सर्वांसमोर आहे. गोव्यात सत्ताधारी भाजप कोरोनासह सर्व आघाड्यांवर अपयशी ठरला आहे. भाजपने काँग्रेसच्या १० आमदारांना खरेदी केले आहे. गोव्याची स्थिती आज बिकट झाली आहे, त्यास हे फुटून गेलेले आमदारही जबाबदार आहेत, असा आरोप गोम्स यांनी केला. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या