सामान्यांनाही न जमणारं असामान्य कर्तृत्व! गोव्याची पहिली पॅरा नॅशनल विजेती साक्षी काळे

इतर मुलं करू शकतात मग मी का नाही? या तत्वावर 75 % अंध साक्षीने नॅशनल स्पर्धेत विजय मिळवून गोव्यातच नव्हे तर देशभरातील सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण तयार केले आहे.
सामान्यांनाही न जमणारं असामान्य कर्तृत्व! गोव्याची पहिली पॅरा नॅशनल विजेती साक्षी काळे
Goa First Para National Gold Medal Winner Sakshi Kale Dainik Gomantak

या पृथ्वीवर देव सर्वांना समान बनवतो, असं आजवर आपण म्हणत आलोय. पण अनेकदा आपण पाहतो की काही माणसं आपल्यापेक्षा वेगळी असतात. पण शारीरिक वेगळेपणावर मात करण्यासाठी एखाद्याचं अख्खं आयुष्य खर्ची पडू शकतं. अशाच एका गोव्यातल्या हरहुन्नरी 17 वर्षीय अंध खेळाडूची कहाणी फक्त गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरातल्या मुलांना प्रेरणादायी ठरते आहे.

आपण बोलत आहोत गोव्यातील उसगावमधल्या 17 वर्षीय साक्षी काळे हिच्याबद्दल. साक्षी काळे ही खरंतर लहानपणापासूनच 75% अंध आहे. पण आपल्या या व्याधीवर तिने कधीही न हिरमुसता किंवा परिस्थितीला दोष न देता आयुष्यात पुढे जाण्याचा जणू विडाच उचलला आहे. नक्कीच तिची कहाणी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी एक नवी उमेद आहे. ‘गोमंतक टीव्ही’साठी सल्लागार संपादक शैलेंद्र मेहता यांनी ‘जायना अशें कांय ना!’ या विशेष कार्यक्रमामध्ये तिची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत साक्षीने आपला संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे. (Goa First Para National Gold Medal Winner Sakshi Kale)

साक्षीला सुरुवातीपासूनच खेळाची आवड आहे. त्यातल्या त्यात तिला फुटबॉलची जास्त आवड आहे. अंडर-14 फुटबॉल टीममध्ये सुद्धा ती खेळली आहे. फुटबॉलची प्रॅक्टिस करता करता तिला धावण्याची म्हणजेच रनिंगची सुद्धा आवड निर्माण झाली.

आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा एक ‘टर्निंग पॉइंट’ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो आणि असाच एक टर्निंग पॉइंट तिच्याही आयुष्यात आला आणि तिला गोवा पॅरालिम्पिक असोसिएशनचे सुदेश ठाकूर यांचं मार्गदर्शन लाभलं. सुदेश ठाकूर यांनी तिची संपूर्ण परिस्थिती समजून घेऊन तिला राष्ट्रीय स्तरावरील खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि फक्त दोन महिने सराव करून साक्षी राष्ट्रीय खेळासाठी (पॅरा ॲथलेटिक्स नॅशनल) भुवनेश्वरमध्ये दाखल झाली. पण या दोन महिन्यांमध्ये तिने प्रचंड मेहनत घेतली. नॅशनल्समध्ये तिने 100 मीटर 200 मीटर रनिंग आणि लॉंग जंपमध्ये भाग घेतला होता. या सरावासाठी तिला रोज उसगावमधून पणजीमध्ये यावं लागायचं. सकाळी 7 ते 9 फुटबॉलचा सराव, त्यानंतर कॉलेज आणि त्यानंतर पुन्हा 4 ते 6 ॲथलेटिक्सचा सराव आणि मग ती घरी जायची. हा दिवसभराचा प्रवास ती एकटीनेच करायची. या दोन महिन्यांमध्ये घेतलेले अथक परिश्रम भुवनेश्वरच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दिसून आले. साक्षीने राष्ट्रीय स्पर्धेत 'लॉंग जंप'मध्ये T12 Blind या प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले; आणि ती बनली गोव्यातील पहिली नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स मधील सुवर्ण पदक विजेती.

तिने 200 मीटरमध्ये रौप्य पदक मिळवले आणि 100 मीटरमध्ये चौथ्या स्थानावर राहून, राष्ट्रीय स्तरावर एकटीने धाव घेतली.

ध्येयवेडी साक्षी..

सध्या बारावीत शिकत असलेली साक्षी अत्यंत सकारात्मक व्यक्ती आहे. तिच्याकडे बघून कुणाला असं वाटणारच नाही की तिच्यामध्ये कुठल्यातरी गोष्टीची कमी आहे . कारण असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन ती पुढे जात आहे. ती म्हणाली की, फुटबॉल किंवा ॲथलेटिक्स मध्ये तिला तिचं करिअर करायचं आहे.

तिच्या आतापर्यंतच्या वाटचालीचं श्रेय ती तिच्या आईबाबांना आणि शिक्षकांना देते. ती म्हणाली, माझे आई-बाबा अत्यंत समजूतदार आणि खंबीर असल्यामुळेच मी एकटीने या सर्व गोष्टी करू शकले. इतर मुलं करू शकतात मग मी का नाही? यावर ठाम राहूनच मी कधी डगमगले नाही. आणि त्यामुळेच मला फक्त राष्ट्रीय पातळीवर समाधान न मानता भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळायचं आहे. तिथे सुद्धा गोव्यासाठी सुवर्णपदक मिळवायची माझी इच्छा आहे. यासाठीचा सराव करण्यासाठी गोवा सरकारने मदत करावी, अशी इच्छा यावेळी साक्षीने व्यक्त केली.

खेळाडूंच्या भविष्यासाठी सरकारच्या योगदानाची गरज!

गोव्याचं आणि कलेचं जितकं घट्ट नातं आहे तितकंच अतूट नातं गोव्याचं आणि खेळांचं सुद्धा आहे. पण साक्षी सारख्या मुलीला दररोज 45 मिनिटं प्रवास करून फक्त सरावासाठी उसगावमधून पणजीला यावं लागतं. या भागांमध्ये खेळाडूंना सराव करण्यासाठी अद्याप कोणतीही सरकारी यंत्रणा राबवण्यात आलेली नाही. विशिष्ट खेळांसाठी लागणारी मैदान अजूनही गोव्यामध्ये विकसित होणं ही गरज आता साक्षीच्या या विजयानं अधोरेखित झाली आहे. गोमंतक टीव्हीशी बोलताना तिने सरकारला ही विनंती केली आहे की, तिच्यासारख्या मुलांसाठी आणि इतर मुलांसाठीही सरकारनं खेळानुसार मैदानांची व्यवस्था करावी जेणेकरून असे अनेकजण जे अजूनही मागे आहेत त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com