विमान उड्डाणात सिंधुदुर्गची बाजी; चिपी विमानतळावरून विमानोड्डाणास परवानगी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

उड्डाण योजनेंतर्गत कोविडपूर्व परिस्थितीत ६८८ वैध मार्गांना मंजुरी दिली होती. त्यापैकी २८१ मार्गांचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे. सरकारने २५ मे पासून देशांतर्गत विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे.

पणजी: पेडणे तालुक्यातील मोप येथील प्रस्तावित हरित विमानतळाचे काम केव्हा पूर्ण होणार याविषयी प्रश्नचिन्ह असतानाच केंद्र सरकारने चिपी येथील विमानतळावरून विमानोड्डाणास परवानगी दिली आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांनी आज राज्यसभेत लेखी स्वरुपात ही माहिती दिली.

उड्डाण योजनेंतर्गत कोविडपूर्व परिस्थितीत ६८८ वैध मार्गांना मंजुरी दिली होती. त्यापैकी २८१ मार्गांचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे. सरकारने २५ मे पासून देशांतर्गत विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे. सरकारने उड्डाण ४.० च्या पहिल्या टप्प्यात ७८ नवीन मार्गांना मंजुरी दिली आहे. यात सिंधुदुर्गातील चिपी येथील विमानतळाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील अमरावती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, दारणा कॅम्प, देवळाली, धुळे, गोंदिया, जत, कराड, कवळपूर, कुडाळ, लातूर, लोणावळा अॅम्बी व्हॅली, उस्मानाबाद, फलटण, शिरपूर, वाळूज यांचा समावेश आहे. उड्डाण योजनेंतर्गत राज्यातील नांदेड-हैदराबाद, मुंबई-कांडला, पोरबंदर-मुंबई, मुंबई-नांदेड, नांदेड-मुंबई, ओझर-दिल्ली, नागपूर-अलाहाबाद, कोल्हापूर- हैदराबाद, कोल्हापूर-बेंगळुरु, नाशिक-हैदराबाद, मुंबई-अलाहाबाद, कोल्हापूर-तिरुपती, जळगाव-अहमदाबाद, पुणे-अलाहाबाद, मुंबई-बेळगाव, मुंबई-दुर्गापूर, मुंबई- कोल्हापूर, मुंबई-जळगाव, नाशिक-पुणे या मार्गांना पूर्वीच उड्डाण-१, उड्डाण-२ आणि उड्डाण-३ मध्ये मंजुरी देण्यात आल्‍याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या