काणकोण परिसरात पूरसदृश स्थिती; चोवीस तासांत ४ इंच पावसाची नोंद

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

आज सकाळी संपलेल्या  चोवीस तासांत काणकोणात ४ इंच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पावसाने १८० इंचाची परिसीमा गाठली आहे.

काणकोण: काणकोणात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे काणकोणच्या वेगवेगळ्या भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी संपलेल्या  चोवीस तासांत काणकोणात ४ इंच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पावसाने १८० इंचाची परिसीमा गाठली आहे.

आता जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली आहे. पाणी जमिनीत मुरत नसल्याने पावसाचे पाणी ओढ्या, नाल्यातून वाहत जाऊन समुद्राला मिळत आहे. भरपूर पाऊस व त्याचवेळी समुद्राला भरती असेल, तर नद्याच्या पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता असते. 

काणकोणमधील तळपण नदीत अर्धफोंड व गालजीबाग नदीच्या पात्रात पैंगीण बाजारातील पुलापर्यत भरतीचा प्रभाव जाणवतो. २००९ मध्ये २ ऑक्टोबरला आलेल्या पुरावेळी भरतीचा प्रभाव होता. गालजीबाग नदीत दुपारी १२.३० वाजता  पाण्याच्या प्रवाहाची उंची ३ मीटर होती. या नदीत धोक्याची सूचना देणारी पातळी ४.८ मीटर आहे. तळपण नदीच्या प्रवाहाची पातळी याचवेळी ७.४० मीटर होती. धोक्याची सूचना देणारी पातळी ७.५ मीटर आहे. संध्याकाळी ५ वाजता ही धोका दर्शवणारी पातळी ओलांडून नदी पात्रातील पाण्याची पातळी ८.२० मीटर झाली. ज्यावेळी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी ८.५० मीटर होते, त्यावेळी नदी पात्राच्या किनारी भागात धोका संभवत असतो.  

दुपारपासून काणकोणात भरपूर पाऊस झाला असल्याने गालजीबाग व तळपण नद्या दुधडी भरून वाहू लागल्या आहेत. या नदी परिसरात पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. चापोली धरणात ३८.८४ आर.एल. जलसाठा तयार झाला आहे. सध्या धरण जलाशयात ११२२ हेक्टर मीटर पाणीसाठा असल्याचे जलस्त्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता आझाद वेर्णेकर यांनी सांगितले.

तळपण नदी पूर आल्याने दोन शेतकरी अडकले
खोतिगावात तळपण नदीच्या किनारी असलेली शेतजमिन व बागायती पाण्याखाली गेली आहे. खोतिगावातील तामणामळ येथे दोन शेतकरी सकाळी नदी ओलांडून शेतात गेले होते. मात्र, दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यामुळे ते शेतातच अडकून पडले. त्यांच्या कुटुंबियांनी काणकोण मामलेदार कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दूरध्वनीवरून याची माहिती देताच मामलेदार विमोद दलाल यांनी अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन घटनास्थळी गेले. मात्र तोपर्यंत नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने त्यांनी नदी पात्र ओलांडून सुखरूप आपले घर गाठले, अशी माहिती मामलेदार विमोद दलाल यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या