गोव्यातीत विद्यार्थ्यांना मिळणार शाळेतून कडधान्‍ये

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

‘कोविड’ महामारीमुळे शाळा बंद असल्या, तरी आता माध्‍यान्ह आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांना कडधान्याचे वाटप येत्या सोमवारपासून केले जाणार आहे

 पणजी: ‘कोविड’ महामारीमुळे शाळा बंद असल्या, तरी आता माध्‍यान्ह आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांना कडधान्याचे वाटप येत्या सोमवारपासून केले जाणार आहे. सरकारी व अनुदानित शाळांतील पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. दोन लाख विद्यार्थ्यांसाठी कडधान्याची खरेदी शिक्षण खात्याने सहकार भांडारकडून करण्यात आली आहे.

शिक्षण खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याविषयीचा आदेश जारी केला होता. त्यानुसार कोविड महामारीमुळे शाळा बंद असलेल्या ठिकाणी माध्यान्ह आहाराऐवजी कडधान्यांचे वितरण विद्यार्थ्यांना करावे, असे नमूद केले होते. 

माध्‍यान्‍ह आहार निकष
प्राथमिक विभागात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रती विद्यार्थी प्रतिदिन ६ रुपये ११ पैसे माध्यान्ह आहारावर खर्च करण्याचा निकष आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रती विद्यार्थी, प्रतिदिन ७ रुपये ४२ पैसे माध्‍यान्ह आहारावर खर्च करण्याचा निकष आहे. सरकारने आता शंभर दिवसाच्या माध्‍यान्ह आहाराएवढे धान्य देण्याचे ठरवले आहे. यासाठी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ६११ रुपयांचे धान्य तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७४२ रुपयांचे धान्य दिले जाणार आहे.

सहकारी संस्‍थांकडूनच धान्‍य खरेदी सहकारी संस्थांकडूनच या धान्याची खरेदी करावी, असे केंद्र सरकारने कळवल्यानुसार सहकार भांडारकडून याची खरेदी शिक्षण खात्याने केली आहे. हे साहित्य भांडारकडून शाळेत पोचवले जाणार आहे. शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी यासंदर्भात विद्यालयाच्या प्रमुखांना परिपत्रक जारी केले आहे. 

त्यानुसार आठवड्यात त्याचे वितरण वर्गवार पालकांना बोलावून केले जाणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना हे धान्य वितरण केले, ते कोणी स्वीकारले, स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी आणि संपर्क क्रमांक अशा नोंदी शाळांना संकलीत करून त्या शिक्षण खात्याला सादर कराव्या लागणार आहेत.

विद्यार्थ्यांना काय देणार?
पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्याला २ किलो मुग, २ किलो गुळ आणि दोन लिटर सोयाबिण तेल देण्यात येणार आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याला सव्वा किलो मुग, ५ किलो गुळ आणि ३ लिटर सोयाबिण तेल देण्यात येणार आहे. यासाठी पालकांना शाळेत बोलावून त्याचे वितरण केले जाणार आहे. एकेका विद्यालयात किती विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत, याची माहिती शिक्षण खात्याने आता मागवली आहे.

 

आणखी वाचा:

आयएसएलच्या आजच्या सामन्यात मुंबई सिटीचे पारडे भारी ; अनुभवी खेळाडूंसह नॉर्थईस्टला देणार टक्कर

संबंधित बातम्या