Goa: विकासाचा धडाका; अधिकाऱ्यांची तारांबळ 'खरी कुजबूज'

Goa: दिव्या राणे यांनी राजकारणात आल्यापासून वनविकास व वनक्षेत्रातील सौंदर्यीकरणाचा धडाकाच लावला आहे.
Divya Rane
Divya RaneDainik Gomantak

Goa: आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष दिव्या राणे यांनी राजकारणात आल्यापासून वनविकास व वनक्षेत्रातील सौंदर्यीकरणाचा धडाकाच लावला आहे. एरवी त्यांचे पतीदेव तथा मंत्री विश्‍वजीत राणे हे नेहमीच प्रकाशझोतात असायचे. मात्र, आता आमदार दिव्या राणे यांनी सत्तरी तालुक्यासह इतर मतदारसंघांमध्येही छाप पाडली आहे.

गेल्या दोन दशकांत सरकारमध्ये अनेक महिला आमदार झाल्या; मात्र दिव्या राणे यांच्यासारख्या सक्रिय कमीच राहिल्या. वन विकास महामंडळामार्फत वनक्षेत्र उभारण्याबाबत त्यांचा विचार आहे. त्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहेत. त्या स्वतः या वनक्षेत्रात अनेक किलोमीटर चालतात.

पर्ये मतदारसंघातून निवडून आल्यापासून त्यांनी कामाच्या बाबतीत पती विश्‍वजीत राणे यांनाही मागे टाकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्या थेट मुख्यमंत्र्यांकडेही आपली बाजू मांडून वनक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे यापूर्वी राजकारणात आलेल्या महिला आमदारांपेक्षा त्या वेगळ्या आहेत, याची जाणीव सरकारला झाली आहे. लोकांशी नम्रपणे वागणे व समस्या ऐकून घेण्याच्या पद्धतीमुळे त्या महिलांमध्येही चर्चेत आहेत.

एल्टनच्या स्पर्धेमध्ये सीनियर प्रकाश!

असे म्हणतात की, खेळामध्ये कधीही राजकारण आणू नये. परंतु केपेतील राजकारणी यावर विश्वास ठेवतात की नाही हे माहीत नाही. पण रविवारी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला भाजप कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी प्रकाश वेळीप हे चक्क खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

एक लाख रुपयांचे पहिले बक्षीस असलेल्या या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हेही उपस्थित होते. मात्र, येथे प्रकाश यांची उपस्थिती अधिक स्पष्टपणे जाणवणारी होती. यात काही राजकारण तर नसेल ना? बेतलात जाऊन कानोसा घ्यावा लागेल!

संमेलनांचा ज्वर आणि निवेदन

गिरीजाताई केळेकर संगीत संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन यंदा सुभाष जाण यांनी नेहमीप्रमाणे सुटसुटीत, मुद्देसूदपणे केले. या अगोदर त्यांनी या संमेलनाचे निवेदन केले की नाही, ते माहीत नाही. पण नेहमीची रटाळ-कंटाळ‘वाणी’ वटवट, बडबड नसल्याचा आनंद संमेलनास उपस्थित असलेल्यांना नक्कीच झाला.

संयत, सुस्पष्ट उच्चारांचे जाण यांचे निवेदन हे वस्तुपाठच ठरावे. स्वप्रेमातून आपलीच टिमकी वाजवत राहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायचा श्रीगणेशा फर्मागुडी गणेशचरणी सुरू झाला आहे, ही स्तुत्य बाब म्हणावी लागेल. आता गोव्यात इतर संमेलनांच्या आयोजकांनीही ‘बडबड’वाल्यांना बाजूला सारायची सेवा अंगिकारावी, हीच इच्छा.

Divya Rane
Goa Corona Update: मोठा दिलासा! आठ महिन्यानंतर गोव्यात शून्य कोरोना रूग्णांची नोंद

यांनाच म्हणतात रवी पात्रांव!

फोंड्यामधील रवी पात्रांव यांच्याबाबत अनेक मतप्रवाह आहेत; पण ते मुत्सद्दी आणि धोरणी राजकारणी आहेत, हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. म्हणूनच गेली 30-35 वर्षे ते फोंड्यात घट्ट पाय रोवून उभे आहेत. जे पक्ष व नेते त्यांच्या राजकीय महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात ते तोंडावर आपटतात, याचा अनुभव काँग्रेस तसेच भाजपने घेतला आहे.

फोंडा नगरपालिकेत नवा संसार मांडण्यासाठी राज्यपातळीवर भाजपबरोबर युती केलेल्या मगोपने टाकलेला डाव आता त्याच्याच अंगलट आला आहे. ही रवी पात्रांवचीच किमया आहे.

प्रदर्शनांची पुन्हा चलती

कोविड संसर्गात बंद झालेल्या व्यापारी प्रदर्शनांची पुन्हा राज्यात जोरात चलती सुरू आहे. आता अशा प्रदर्शनांना मडगावात ऊत येऊ लागला आहे. मध्यंतरी न्यू मार्केटवाल्यांनी त्याविरुध्द आवाज उठवल्यावर ती रवींद्र भवन, एसजीपीडीए मैदान येथे स्थलांतरित केली होती;

पण आता ती पुन्हा शहरामध्ये होऊ लागल्याने पाजीफोंड येथील रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे ती बेशिस्त पार्किंगमुळे. काहीजणांनी तर पालिकेतील हा सत्तांतराचा परिपाक असल्याचे आरोप सुरू केले आहेत. काहीही असले, तरी बेशिस्त कारभाराचा फटका जनतेलाच बसतोय, हे खरे.

पर्यटनमंत्र्यांचे घुमजाव

सरकारने समुद्रकिनारी उपद्रवी व्यक्तींविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हल्लीच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले होते. पोलिस कारवाई करण्यास असमर्थ ठरतात. मात्र, बदनामी पर्यटन खात्याची होते, असेही आरोप त्यांनी केले होते.

मात्र, ते वक्तव्य करून दोन दिवस उलटण्यापूर्वीच याच मंत्र्यांनी घुमजाव केले आहे. समुद्रकिनारी उपद्रवी घटकांची समस्या ही सरकारची असून पर्यटन व पोलिस खाते पर्यटकांना सुरक्षा देण्यात यशस्वी ठरतील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या बदललेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पोलिस खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्याविरुद्धच पर्यटनमंत्र्यांनी दंड थोपटल्याने ते त्यांच्या अंगलट आले. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना समज दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी घुमजाव केले. अपक्ष आमदार असताना त्यांना पोलिसांनी रात्रीच्यावेळी घरातून आणले होते. त्याचा राग अजूनही गेलेला नसावा. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल, तेव्हा पर्यटनमंत्री पोलिसांवर तोंडसुख घेण्यास विसरत नाहीत.

Divya Rane
Petrol-Diesel Prices In Goa: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या आजचे दर

कचऱ्याची विल्हेवाट कोण लावणार !

तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर जुने गोवे येथे सेंट झेवियर फ्रान्सिसचे फेस्त उत्साहात साजरे झाले. परंतु फेस्तामुळे प्रचंड प्रमाणात कचरा देखील तयार झाला आहे. जुने गोवे येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागल्याने या कचऱ्याची विल्हेवाट कोण आणि कधी लावणार, अशी चर्चा जुने गोवे चर्च परिसरात सुरू झाली आहे. खरे तर बायंगिणी येथे म्हणजे जुने गोवेतच कचरा प्रकल्पाला विरोध होत आहे. परंतु फेस्तातला कचरा लोकांना नको आहे.

‘राष्ट्रपती येती घरा....’

‘साधू संत येती घरा...ही खरे तर जुनीच म्हण आहे. पण काणकोणमधील रहिवासी सध्याच्या युगात त्याची अनुभूती थोड्याशा वेगळ्या पध्दतीने व ती वाक्यरचना बदलून घेत आहेत. येत्या आठवड्यात काणकोण तालुक्यातील आमोणा या अंतर्गत भागात होऊ घातलेल्या लोककला महोत्सवाच्या उदघाटनासाठी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येणार असल्याने त्या निमित्ताने कधी नव्हे ते तेथील अंतर्गत भागातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेची धावपळ उडाली.

अर्थात, त्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना तंबी दिली होती, ही गोष्ट वेगळी. आता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींचा हा दौरा रद्द झाला आहे. पण काणकोणकर मात्र खूश आहेत; कारण यानिमित्ताने तेथील रस्ते गुळगुळीत झालेत. म्हणून ‘राष्ट्रपती येती घरा तोची....’ असे म्हणत ते समाधान व्यक्त करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com