गोवा फॉरवर्डतर्फे फातोर्ड्यात ‘कोविड सहायता केंद्र’

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई म्हणाले,  जनतेला शास्त्रोक्त मदत मिळावी यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत. विशेषतः गरिबांना योग्य उपचार मिळावेत यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मडगाव: कोविड महामारीच्या काळात फातोर्डा मतदारसंघात लोकांना मदत मिळावी यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाकडून कोविड रुग्ण वाहिका आणि कोविड सहायता केंद्र सुरु करण्यात आले आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांच्या हस्ते या सेवांचे स्वातंत्र्यदिनी उदघाटन करण्यात आले.

डॉ. मिलिंद देसाई, जगदीश भोबे, उषा सरदेसाई, माजी नगरसेवक राजू नाईक, गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते प्रशांत नाईक, नगरसेवक लिंडन परेरा  उपस्थित होते. व्ही फॉर फातोर्डा आणि देसाई मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले असून फातोर्डातील घरात राहून उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन या केंद्रातून केले जाणार आहे.

डॉ. देसाई यांनी कोविड सहायता केंद्र व रुग्णवाहिका सेवेविषयी माहिती दिली.  कोविडची बाधा झालेले रुग्ण मानसिक तणावाखाली येत असल्याने कित्येकवेळा प्रतिकारशक्ती कमी होते. ही प्रतिकार शक्ती कायम राहावी यासाठी या केंद्राद्वारे घरात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. ते व त्यांचे सहकारी रुग्णांकडून येणारे फोन घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील तसेच जर कुठल्याही रुग्णाला इस्पितळात भरती करायचे असल्यास त्यासाठी सुसज्ज रुग्णवहिकेची सोयही करण्यात आल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.

यावेळी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले,  जनतेला शास्त्रोक्त मदत मिळावी यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत. विशेषतः गरिबांना योग्य उपचार मिळावेत यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. वास्तविक आम्हाला तपासणी केंद्र सुरू करायचे होते पण सरकारच्या काही नियंत्रणामुळे आम्ही ते सुरू करू शकलो नाही, फातोर्डातील जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा  आमचा प्रयत्न असेल जर कुठल्याही नागरिकाला मदत हवी असेल तर त्यांनी ८८८८४१११११ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

फातोर्डा मतदारसंघात कोविड निगा केंद्र सुरू करण्याची गरज असून रवींद्र भवनात ते सुरू करावे, अशी मागणी आपण आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे केली आहे. ही मागणी जर सरकारने पूर्ण केली नाही तर तो या मतदारसंघातील लोकांवर सरकारने केलेला अन्याय असेल असे ते म्हणाले.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या