गोवा फॉरवर्डकडून आयारामांना नो चान्स

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

गोवा फॉरवर्डने पेडण्यातील समाजकार्यकर्ते व पेशाने वकील असलेले जितेंद्र गावकर यांना पक्षामध्ये आज प्रवेश देऊन उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेडणेवासीयांना त्यांच्याच समाजाचा स्थानिक युवा उमेदवार लाभला आहे, असे उद्‌गार पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काढले.

पणजी :  पेडण्याचे माजी आमदार देऊ मांद्रेकर हे वगळता मतदारसंघात समाजाचे स्थानिक उमेदवार असूनही  वास्को व मडगाव येथून बाहेरील उमेदवार आयात करून लोकांवर लादले गेले. आमदार स्थानिक नसल्याने पेडणेवासियांच्या अनेक समस्या व अडचणी याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डने पेडण्यातील समाजकार्यकर्ते व पेशाने वकील असलेले जितेंद्र गावकर यांना पक्षामध्ये आज प्रवेश देऊन उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेडणेवासीयांना त्यांच्याच समाजाचा स्थानिक युवा उमेदवार लाभला आहे, असे उद्‌गार पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काढले.

पणजीतील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ॲड. जितेंद्र गावकर यांना माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पक्षाची निशाणी असलेले श्रीफळ देऊन प्रवेश दिला. यावेळी व्यासपीठावर आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाईम्हणाले, पेडण्यात आयात केलेल्या नरकासुरांना जागा दाखवून देण्यासाठी दिवाळीपूर्वी पेडणे फॉरवर्ड करण्याचे ठरविण्यात आले होते. पेडण्यात सध्या स्थानिक टॅक्सी, रेती व्यवसाय तसेच पाणीपुरवठा कंत्राटदारांवर आयात आमदाराने नियंत्रण ठेवून माफियाराज सुरू ठेवले आहे. या मतदारसंघात मोपा विमानतळही उभे राहत आहे. या विमानतळाच्या जीएमआर कंपनी व सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा सावळागोंधळ माजला आहे. मुख्यमंत्री व मंत्री हे आपल्या मर्जीप्रमाणे वागत असून कोणाचा पायपोस कोणाला नाही. मुख्यमंत्री आपली खुर्ची टिकवून ठेवण्यासाठी अशा गोष्टींकडे मात्र जाणुनबुजून डोळेझाक करत आहे, असा आरोप त्यांनी केला. 

पेडणे मतदारसंघातील स्थानिक उमेदवार देऊ मांद्रेकर यांच्यानंतर कोणत्याच पक्षाने दिला नाही. या मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. या भागातील गरीबांच्या समस्या व अडचणी समजून घेण्यासाठीच शिक्षित तसेच न्यायासाठी लढा देणाऱ्या व तेथील दहशतपासून मुक्त करण्यासाठी ॲड. जितेंद्र गावकर या तरुण उमेदवाराला प्रवेश दिला गेला आहे. राज्यात दहशत निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी चालविला आहे. पुरातन काळातील सौझा लोबो यांचे जुने रेस्टॉरंट अँड बार एका परप्रांतियांने बाऊन्सर आणून एका रात्रीत पोलिसांच्या आशिर्वादाने जमिनदोस्त केले. खरे तर या परप्रांतीयाला अटक करायला हवी होती. मात्र, तसे का झाले नाही याचे सरकारने उत्तर देण्याची गरज आहे. कोळसा विरोधात राज्यात जनजागृती सुरू असताना ध्वनिक्षेपकासाठी परवानगी नाकारण्यात येते. यावरून गोव्यातही आता बिहार व उत्तरप्रदेशप्रमाणे दहशत सुरू झाली आहे. विरोधकांचा आवाज चिरडण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. पेडण्यातील हप्ता बंद पिक्चर बंद करून गांधी मार्केट - मडगाव येथील नरकासुराला परत पाठवण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’नुसार ॲड. गावकर यांना पेडण्यातील समाजाचा नेता म्हणून गोवा फॉरवर्डचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे सरदेसाई म्हणाले. 

संबंधित बातम्या