गोवा फॉरवर्ड पक्षाची नव्या चेहऱ्यांना पसंती

UNI
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

मडगाव पालिका निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डचे काही उमेदवार निश्चित झाले असून त्यांना उमेदवार म्हणून प्रोजेक्टही करण्यात येत आहे. गोवा फॉरवर्डच्या मागच्या पॅनलमधील काही मावळत्या नगरसेवकांनी आपण बाजुला सरून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

मडगाव - मडगाव पालिका निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डचे काही उमेदवार निश्चित झाले असून त्यांना उमेदवार म्हणून प्रोजेक्टही करण्यात येत आहे. गोवा फॉरवर्डच्या मागच्या पॅनलमधील काही मावळत्या नगरसेवकांनी आपण बाजुला सरून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. 

या संभाव्य उमेदवारांत माजी नगराध्यक्ष पूजा नाईक, माजी नगरसेवक ग्लेन आंद्राद, लिंडन परेरा, जॉनी क्रास्टो यांच्यासह प्रवीण जना नाईक, रवींद्र नाईक, सुजय लोटलीकर, निमिशा फालेरो, रितीका नाईक यांची नावे आहेत. 
पूजा नाईक यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या प्रभाग ९ मध्ये रविंद्र नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पुजा नाईक या अन्य प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत. माजी नगराध्यक्ष बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या प्रभाग ६ मध्ये प्रवीण जना नाईक यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. 

प्रभाग ५ चे प्रतिनिधीत्व केलेले पीटर फर्नांडिस यांनी स्वतःच आपल्या जागी या प्रभागात सुजय लोटलीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पीटर फर्नांडिस यांनी  एसटी समाजाचा प्रभाव असलेल्या प्रभागातील प्रचाराची जबाबदारी स्विकारली आहे. 

प्रभाग ११ मध्ये माजी नगरसेवक राजू नाईक यांच्या कन्या रतिका नाईक यांना गोवा फॉरवर्ड पॅनलची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. गोवा फॉरवर्डचे अॅंजेलिस परेरा यांनी या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केले होते. तथापि, या खेपेस हा प्रभाग महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. राजू नाईक यांनी आज गोवा फाॅरवर्डच्या पत्रकार परिषदेत आपली कन्या प्रभाग ११ मधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. 

माजी नगरसेवक जॉनी क्रास्टो हे गोवा फॉरवर्डतर्फे प्रभाग २ मधून निवडणूक लढवतील. प्रभाग २ ओबीसीसाठी राखीव झाल्याने या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केलेले गोवा फाॅरवर्डचे लिंडन परेरा यांनी निवडणूक लढवण्यासाठी प्रभाग ३ ची निवड केली आहे. प्रभाग ३ मध्ये जॉनी क्रास्टो यांच्या भावजय झिटा क्रास्टो यांनी प्रतिनिधीत्व केले होते. मागच्या वेळी महिला ओबीसीसाठी हा प्रभाग राखीव ठेवण्यात आल्याने जॉनी क्रास्टे ऐवजी झिटा क्रास्टो यांना निवडणुकीस उभे करण्यात आले होते. आगामी निवडणूक आपण न लढवता जाॅनी क्रास्टो यांना संधी देण्याचा निर्णय झिटा क्रास्टो यांनी घेतला आहे. 

माजी उपनगराध्यक्ष टिटो कार्दोझ यांच्या उमेदवारीबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. कार्दोझ हे सरदेसाई यांच्या निकटच्या वर्तुळातील मानले जातात.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या