धमकी प्रकरणातील संशयिताला तीन दिवसांचा रिमांड

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील अन्य राजकारणी व्यक्तींना धमकीचे संदेश पाठवणाऱ्याला फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या कुठ्ठाळी येथील आशिष सुरेश नाईक मडकईकर याला फोंड्यातील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्याला तीन दिवसांचा रिमांड देण्यात आला.

फोंडा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील अन्य राजकारणी व्यक्तींना धमकीचे संदेश पाठवणाऱ्याला फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या कुठ्ठाळी येथील आशिष सुरेश नाईक मडकईकर याला फोंड्यातील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्याला तीन दिवसांचा रिमांड देण्यात आला. दरम्यान, हे धमकी प्रकरण म्हणजे प्रत्यक्षात गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी नव्हे, तर अन्य कुणाला गोवण्याचा प्रयत्न असून संशयिताने कुणावर तरी सूड उगवण्यासाठी मोबाईलद्वारे हे संदेश पाठवले होते असे समजते. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आशिष सुरेश नाईक मडकईकर याने मुख्यमंत्र्यांसह इतर अनेकांना धमकीचे संदेश पाठवले होते. मानहानीकारक संदेशसोबतच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. फोंड्यात गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत यांना गेल्या २८ ऑक्‍टोबरला हा धमकीचा संदेश देण्यात आला होता. दुर्गादास कामत यांनी या धमकीप्रकरणी गेल्या ७ नोव्हेंबरला फोंडा पोलिसांत अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंदवताना धमकी आलेल्या मोबाईलचा क्रमांक पोलिसांना दिला होता. मुख्यमंत्री तसेच दुर्गादास कामत यांच्यासह अन्य राजकारण्यांनाही अशाचप्रकारची धमकी आल्यामुळे फोंडा व पणजीसह कुडचडे व वेर्णा पोलिस स्थानकात तक्रारी नोंद झाल्या होत्या. 

या धमकीसंबंधी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर फोंडा पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करताना संशयित आशिषला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुर्गादास कामत यांच्यासह मुख्यमंत्री व इतरांना आपणच धमकी दिल्याचे कबूल केल्याने पुढील तपासासाठी त्याला रिमांड घेण्यात आला आहे. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. 

भाजपकडून गुन्हेगारीला प्रोत्साहन ः दुर्गादास कामत
गोव्यात भारतीय जनता पक्षाकडून गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात असून पद्धतशीरपणे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून चालला आहे. आपल्याला धमकी दिलेला आशिष हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असून भाजपच्या नेत्यांबरोबर त्याचे फोटोही आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी या आशिषचे भाजपचे सदस्यत्व रद्द केले काय, हे आधी सांगावे, असे जाहीर करून निवडणुका जवळ आल्याने भाजपकडून समाज माध्यमांद्वारे विरोधकांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडत असून या कामासाठीच काहीजणांना भाजप सरकारने पगारावर ठेवले असल्याचा आरोप दुर्गादास कामत यांनी केला.
 

संबंधित बातम्या