खाणपट्ट्यांच्या बेकायदा नूतनीकरणासंदर्भात गोवा फाउंडेशनची उच्च न्यायालयात धाव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

राज्यातील ८८ खाणपट्ट्यांच्या नूतनीकरणासाठी बेकायदा दिलेल्या परवानगीसंदर्भात गोवा लोकायुक्तानी गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्याने त्याला गोवा फाउंडेशनने आव्हान दिले आहे.

पणजी : राज्यातील ८८ खाणपट्ट्यांच्या नूतनीकरणासाठी बेकायदा दिलेल्या परवानगीसंदर्भात गोवा लोकायुक्तानी गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्याने त्याला गोवा फाउंडेशनने आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यासंदर्भात सरकारसह इतर प्रतिवाद्यांना नोटीस देऊन पुढील सुनावणी १ डिसेंबरला ठेवली आहे. 

माजी गोवा लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी खाण खात्याने ८८ खाणपट्ट्यांना नूतनीकरणासाठी दिलेल्या परवानगी बेकायदा असल्याने त्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) किंवा त्यामध्ये राजकारणी असल्यास ही चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याची शिफारस केली होती. लोकायुक्ताने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सरकारने नकार दिला होता व त्यावर राज्यपालांनीही शिक्कामोर्तब केले होते. सरकार व राज्यपालांच्या या आदेशांना गोवा फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊन त्या रद्द करण्याचे व गुन्हा नोंद करून चौकशीचे आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. 

खाणपट्ट्यांच्या नूतनीकरणासाठी परवानगी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खाण सचिव पवन कुमार सेन व माजी खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी संगनमताने दिली असल्याचे गोवा लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या नूतनीकरणाचा फायदा खाण कंपन्यांना होणार असल्याचे तसेच राज्य सरकारला त्याचे नुकसान होईल याची माहिती असूनही त्यांनी हे काम केले होते. या तक्रारीवर सुनावणी घेऊन करण्यात आलेल्या आरोपाबाबत लोकायुक्तांनी समाधान व्यक्त करून आदेश दिला होता. या आदेशात पवन कुमार सेन व प्रसन्न आचार्य हे त्यांच्याकडे असलेल्या पदाचा योग्य वापर करण्यास ते लायक नाहीत. या याचिकेत राज्यपाल, मुख्यमंत्री, लक्ष्मीकांत पार्सेकर, पवन कुमार सेन, प्रसन्न आचार्य, मुख्य सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या