मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पशुवैद्यकीय हॉस्पिटल प्रकल्पाची पायाभरणी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

अस्नोडा-दोडामार्ग रस्त्याच्या बाजूने जलसंपदा खात्याची काही जागा या प्रकल्पासाठी पशु वैद्यकीय खात्याकडे हस्तांतरीत करण्यात आली असून, या जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे.

डिचोली: सरकारच्या कृषी विकास योजनेंतर्गत सुमारे दहा कोटी रुपये खर्च करुन मुळगाव-डिचोली येथे पशुवैद्यकीय हॉस्पिटल प्रकल्प बांधण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या प्रस्तावित प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. 

अस्नोडा-दोडामार्ग रस्त्याच्या बाजूने जलसंपदा खात्याची काही जागा या प्रकल्पासाठी पशु वैद्यकीय खात्याकडे हस्तांतरीत करण्यात आली असून, या जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे. प्रकल्पाच्या पायाभरणी सोहळ्यास डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर, मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांची उपस्थिती होती. 

पशुवैद्यकीय हॉस्पिटलमुळे डिचोली तालुक्‍यातील शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे. असा विश्वास सभापती राजेश पाटणेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला. हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्‌दल जलसंपदा खात्याचे मंत्री फिलीप नेरी आणि अधिकाऱ्यांना त्यांनी धन्यवाद दिले. हा प्रकल्प मुळगाव गावात होत असल्याबद्‌दल सरपंच प्रकाश आरोंदेकर यांनी सरकारला तसेच सभापतींना धन्यवाद दिले. 

पायाभरणी सोहळ्यास अन्य मान्यवरात पशु वैद्यकीय खात्याचे संचालक डॉ. संतोष देसाई, डॉ. राजेश केणी आणि अन्य अधिकारी तसेच मुळगावची उपसरपंच आनंदी परब, पंच गजानन मांद्रेकर, महेश्वर परब, विशालसेन गाड, नियुक्‍त पंच निलेश हळर्णकर, अडवलपालचे सरपंच नारायण साळगावकर, साळचे सरपंच घन:श्‍याम राऊत, पंच प्रकाश राऊत, मेणकूरची सरपंच संजना नाईक, लाटंबार्सेचे सरपंच ज्ञानेश्वर गावस, उपसरपंच यशवंत वरक आदी उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या