न्हावेलीतील खून कौटुंबिक कारणातूनच; चुलत भाऊ, भाच्यासह तिघांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

पश्‍चिम बंगालमधील जमिदार रेहमान याचा खून हा कौटुंबिक कारणातूनच झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या खूनप्रकरणी मयताच्या दोन जवळच्या नातलगासह तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

डिचोली: न्हावेली-साखळी येथील खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे योग्यदिशेने वळवताना ४८ तासांच्या आत खुनाचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. पश्‍चिम बंगालमधील जमिदार रेहमान याचा खून हा कौटुंबिक कारणातूनच झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या खूनप्रकरणी मयताच्या दोन जवळच्या नातलगासह तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

संशयित आरोपीनी खून केल्याची कबुली दिली आहे. मयत जमीदार याचा नात्याने चुलत भाऊ असलेल्या चांदमिया जब्बार (वय ३५) आणि नात्याने भाचा असलेल्या मिशान रेहमान (वय २६) (रा. दोघेही मूळ पश्‍चिम बंगाल) आणि संजय पासवान (मूळ बिहार) या तिघांनी मिळून जमिदार याची निर्घुनपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित तिन्ही आरोपींना डिचोली येथील प्रथम श्रेणी न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना दहा दिवसांचा पोलिस रिमांड मंजूर करण्यात आला आहे.

संशयित चांदमिया हा मोहित इस्पातचा मजूर कंत्राटदार असून, अन्य संशयितांसह मयत जमीदार त्याच्याकडे कामाला होते. संजय पासवान हा चांदमिया याचे आर्थिक व्यवहार पाहत होता. 

न्हावेली येथील कंपनीच्‍या कामगारांसाठी असलेल्या निवारा चाळमधील एका रुममध्ये नेहमीप्रमाणे गेल्या मंगळवारी जमिदार रेहमान याचा तिघांही संशयितांनी निर्दयपणे खून केला. त्‍यानंतर धारदार हत्याराने त्याच्या शरिराचे तुकडे करून ते पिशवीत गुंडाळून मागच्या बाजूला कुंपणाबाहेर झाडीत टाकले. 

खास पथकाद्वारे तपास..!
पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य (आयपीएस), उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी या खून प्रकरणी जातीने लक्ष घालून पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. डिचोली पोलिस ठाण्याचा हंगामी ताबा असलेले म्हापसाचे उपअधीक्षक गजानन ‌प्रभूदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकाऱ्यांचे खास पथक तपासासाठी नियुक्‍त करण्यात आले होते. यात डिचोलीचे पोलिस निरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक विजय रामानंद, दिपेश शेटकर, प्रसाद पाळणी, प्रज्यीत मांद्रेकर, पणजीचे पोलिस निरीक्षक सुदेश नाईक, म्हापसाचे पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर, पेडणेचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर, वाळपईचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर, क्राईम ब्रॅंचचे निरीक्षक दत्तगुरु सावंत, फिलोमेना कॉस्ता आणि संतोष गावडे यांनी तपासकामात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना अक्षय तिरोडकर, किशोर सिनारी, गौरव वायंगणकर, रोहन गावस आणि अन्य पोलिसांनी सहकार्य केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या