राज्य सरकारकडून चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

अजित पंचवाडकर यांची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संचालकपदी (प्रशासन) बदली करण्यात आली आहे. मेघना शेटगावकर या सचिवालयातील कार्मिक खात्यात पुढील आदेशापर्यंत रूजू होतील.

पणजी/मडगाव: राज्य सरकारने आज चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सुधीर केरकर यांची माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. बिजू नाईक यांची मडगाव पालिका मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. अजित पंचवाडकर यांची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संचालकपदी (प्रशासन) बदली करण्यात आली आहे. मेघना शेटगावकर या सचिवालयातील कार्मिक खात्यात पुढील आदेशापर्यंत रूजू होतील.

पंचवाडकर यांच्या वाढदिन कार्यक्रमात सामाजिक अंतर नियमाचे उल्लंघन झाल्याचा एक व्डिडियो समाज माध्यमात व्हायरल झाला होता. पालिकेच्या एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकऱणी त्यांच्या विरुद्ध विशाखा समितीकडून चौकशी सुरु आहे. या दोन्ही प्रकरणांचा उल्लेख करून त्यांची बदली करावी अशी मागणी पालिका कर्मचारी संघटनेने बुधवारी केली होती. त्यांच्या बदलीचा आदेश आज कार्मिक खात्याचे अवर सचिव शशांक ठाकूर यांनी जारी केला. 

पंचवाडकर यांची बदली बऱ्याच आधी व्हायला हवी होती. त्यांच्या बदलीमुळे मडगाव व फातोर्डाच्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पुजा नाईक यांनी व्यक्त केली. 

पंचवाडकर यांच्या वाढदिवसाच्या व्हिडियोमुळे मडगाव पालिकेची प्रतिमा मलिन झाली. त्यांच्या मुख्याधिकारीपदाच्या गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत त्यांनी पालिका मंडळाकडे पूर्णपणे असहकार्य केले. कामकाजात त्यांनी मनमानी केली व त्यामुळे पालिकेचे प्रशासन कोलमडून गेले. याचा मडगाव व फातोर्डातील जनतेला फटका बसला. त्याच्या विरुद्ध लैगीक छळ प्रकरणाची चौकशीही सुरु आहे. त्यांच्या बदलीमळे मडगाव पालिकेच्या कारभारात सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा आहे, असे नाईक यांनी सांगितले. 

मडगाव पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर हे मुजोर अधिकारी असुन त्यांना आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांशी कसे वागावे हे त्यांना समजत नव्हते.आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना ते तुच्छ वागणूक देत असल्याच्या तक्रारी आल्याने त्यांची अन्यत्र बदली करावी अशी मडगाव पालिका कर्मचारी संघटनेची गेली अनेक महिन्यांपासून मागणी होती. 

सरकारने मागणी मान्य करून त्यांची अन्यत्र बदली केल्याने आपण मडगाव पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे मडगाव पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल शिरोडकर यांनी सांगितले.  

पंचवाडकर यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी फातोर्डाचे आमदार व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही केली होती. पंचवाडकर हे कोविड कमांडंट होते. त्यांनीच सामाजिक अंतर नियमाचे उल्लंघन केल्याने सरकार त्यांच्या विरुद्ध कोणती कारवाई करते ते पाहावे लागेल, असे वक्तव्य सरदेसाई यांनी केले होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या