गोरक्षकांची मागणी: गुरांच्या वाहतूकप्रकरणी गुन्हा नोंदवा

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

गोरक्षकांची मागणी: अन्यथा आंदोलनाचा इशारा

फोंडा: बेतोडा येथे गुरांना छोट्या टेंपोत कोंबून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांना फोंडा पोलिसांच्या ताब्यात देऊनही दोषींवर कोणतीच कारवाई न करता केवळ दहा ते पन्नास रुपयांचा दंड आकारून सोडणे म्हणजे तमाम हिंदू बांधवांचा हा अवमान असून येत्या सोमवारपर्यंत दोषींवर कारवाई करा, अन्यथा मंगळवारी गोरक्षक पोलिस स्थानकासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा गोरक्षकांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. केवळ आंदोलनच नव्हे तर याप्रकरणी न्यायालयातही दाद मागण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

फोंड्यात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला राजपूत क्षत्रिय वंशचे सरचिटणीस वीरसिंग निमला, राष्ट्रीय युवा हिंदू वाहिनीचे सरचिटणीस राजीव झा तसेच परशुराम गोमंतक सेनेचे पदाधिकारी आदिश उसगावकर उपस्थित होते. 

राज्यात सध्या गुरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचा आरोप करून प्रत्येकवेळेला हिंदू संघटनांनाच अशा कत्तलीसंबंधी पोलिसांना जाणीव करून द्यावी लागत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या 5 तारखेला छोट्या टेंपोत कोंबून बैल व गाईंची बेकायदा वाहतूक चालली होती, ती गोरक्षकांनी बेतोडा हे वाहन अडवून गुरांच्या कत्तलीचा डाव हाणून पाडला. पोलिसांकडे टेंपोसह गुरे व टेंपोतील चालक आणि सहायकाला दिले असले तरी केवळ नाममात्र शुल्क आकारून संशयितांना सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे या गुरांत केवळ दोघांनाच ‘टॅग’ लावण्यात आला होता. 

याप्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते, मात्र पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई केल्याचे पत्र सादर केले असून संशयितांना रान मोकळे केले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा आणि न्यायालयात दाद मागण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

संबंधित बातम्या