जीबीएसएचएसईतर्फे दहावीची आजपासून पुरवणी परीक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

राज्यभरातील ११ केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या पुरवणी परीक्षेला १३४२ परीक्षार्थी असून त्यापैकी ७५० मुले व ५९२ मुली आहेत.

पणजी: गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा उद्या १५ सप्टेंबरपासून सुरू  होऊन ती २२ सप्टेंबरला संपणार आहे. राज्यभरातील ११ केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या पुरवणी परीक्षेला १३४२ परीक्षार्थी असून त्यापैकी ७५० मुले व ५९२ मुली आहेत. 

सर्व श्रेणींसाठी (सामान्य/सीडब्ल्यूएसएन/पूर्व-व्यावसायिक/एनएसक्यूएफ श्रेणी) सकाळच्या सत्राला सकाळी ०९.३० वाजता व संध्याकाळच्या सत्राला दुपारी ०२.३० वाजता सुरवात होईल. सर्व परीक्षार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटांपूर्वी आपापल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. 

प्रत्येक विषयाची परीक्षा सुरू होऊन ३० मिनिटे उशिराने पोहोचल्यास, परीक्षार्थ्याला परीक्षेला बसण्यास अपात्र ठरविले जाईल. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.gbshse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे. 

परीक्षार्थ्यांनी स्वत:च्या पाण्याच्या पारदर्शक बाटल्या, मास्क, सॅनिटायझर लिक्विड आणावे व आपल्यासोबत कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट आणू नये. त्यांनी प्रवेश पत्रावरील आणि मुख्य उत्तर पुस्तिकेवरील छापील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. परीक्षार्थ्यांना जर खोकला, शिंका, सर्दी झालेली असल्यास त्याचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून त्यांनी सरकारी वैद्यकीय चिकित्सकांकडून स्वत:ची तपासणी करणे आवश्यक आहे. परीक्षार्थ्यांना जर काही शंका असल्यास, त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रांच्या मार्गदर्शकांशी/निरीक्षकांशी किंवा हेल्पलाईन क्रमांक ८४५९७१०१७१/८४५९७१०१७२ यावर संपर्क साधावा.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या