गोव्याला वित्त आयोगाकडून ७५ कोटी 

विलास महाडिक
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

सौंदर्यीकरण, स्वच्छता तसेच सांडपाणी निचरा या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे या पंचायतीमधील कामे आणखी सुधारण्यासाठी मदत होईल

पणजी

केंद्रीय १५ व्या वित्तीय आयोगाने गोव्यातील पंचायतीच्या विकासकामांसाठी सुमारे ७५ कोटींची आर्थिक मदत दिली आहे. त्यातील सुमारे १५ टक्के मदत ही जिल्हा पंचायतींसाठी दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत पंचायत क्षेत्रात स्वच्छता, सांडपाणी निचरा व सौंदर्यीकरणासाठी पंचायतींना दिली जाईल अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. 
आयोगाने गोवा सरकारला दिलेल्या आर्थिक मदतीबाबत अधिक माहिती देताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, आयोगाकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीतील ७५ कोटींपैकी १७.५ कोटींची रक्कम जिल्हा पंचायतींसाठी मिळणार असल्याने या रक्कमेतून मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी मदत होणार आहे. त्यांना वारंवार सरकारवर निधीसाठी अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. उर्वरित रक्कम ही राज्यातील १९१ पंचायतीमधील कामांसाठी दिली जाणार आहे. यामध्ये सौंदर्यीकरण, स्वच्छता तसेच सांडपाणी निचरा या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे या पंचायतीमधील कामे आणखी सुधारण्यासाठी मदत होईल असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी मत मांडले. 
देशात तसेच राज्यात कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर पंचायत क्षेत्रातील कामांना खिळ बसली आहे. सर्व कामे ठप्प झाली आहेत व हा कोरोना महामारी आटोक्यात येण्यास सुरुवात झाल्यानंतर ही विकासकामे सुरू केली जातील. या महामारीमुळे राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक कधी होईल याची तारीख सांगता येत नाही. गोव्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या व मृत्यू वाढत आहेत. अशा स्थितीत निवडणुकीची तारीख ठरविणे योग्य होणार नाही. जेव्हा या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात होईल तेव्हाच्या परिस्थितीनुसार त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. संपूर्ण जग या कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे या महामारीवर नियंत्रण ठेवण्यावर अधिक लक्ष महत्त्वाचे आहे असे मंत्री गुदिन्हो म्हणाले. 
 

संबंधित बातम्या