गोवा: केंद्रीय उच्च स्तरीय समितीच्या अहवालाचे गोवा फॉरवर्डकडून स्वागत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

गोव्यातील जैव विविधतेसाठी महत्वाचे क्षेत्र असलेले मोलेचे जंगल वाचविण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे.

मडगाव: गोव्यात येऊ घातलेल्या तीन  प्रकल्पाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या केंद्रीय उच्च स्तरीय समितीने दिलेल्या अहवालाचे गोवा फॉरवर्ड पार्टीने स्वागत केले असून गोव्यातील जैव विविधतेसाठी महत्वाचे क्षेत्र असलेले मोलेचे जंगल वाचविण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. पर्यावरण रक्षणासाठी गोव्यातील युवकांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फळ असल्याचे नमूद करीत गोव्याचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुढे सरसावलेल्या या युवा पिढीला कुणी गृहीत धरू नये असा इशारा सरदेसाई यंनी दिला आहे. (Goa Goa Forward welcomes the report of the Central High Level Committee)

गोवा वाचवण्यासाठी टीम गोवा ही संकल्पना पुढे आली आहे, तिचे ही युवा पिढीच अग्रदूत असून गोवा वाचविण्यासाठी ती रस्त्यावर येण्याबरोबरच समाज माध्यमातही सक्रिय होती. सरकारी आदेशावरून या तरुणांना पोलिसांच्या जाचालाही सामोरे जावे लागले. पण. त्यांनी त्याची पर्वा केली नाही. गोव्याचे रक्षण कऱण्यासाठी काहींनी आपल्या भविष्याचीही चिंता केली नाही. ही युवा पिढीच टीम गोवाचा प्रेरणास्त्रोत असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Goa Lockdown: पहा काय सुरु काय बंद

मोले हा केवळ गोव्यापुरता मर्यादित विषय नाही. तो राष्ट्रीय मुद्दा होता. युवा पिढीने याविरुद्ध दिलेली हाक सगळ्या देशाला ऐकू आली. पण.  आमच्या मुख्यमंत्र्यांना ती ऐकू आली नाही ही दुर्दैवाची बाब असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

गोव्याच्या पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेली ही मोहीम अशीच चालू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करताना गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही टीम गोवा स्थापन करण्यात आली आहे असे ते म्हणाले. मोलेचे रक्षण करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व बिगर सरकारी संस्थांना गोवा फॉरवर्डचा पाठिंबा असेल. या पर्यावरण रक्षण लढ्यात आम्ही नेहमीच लोकांबरोबर राहू असे आश्वासन सरदेसाई यांनी दिले आहे.

गोव्याच्या इतिहासात आजच्या सारखा अंधार यापूर्वी कधीच नव्हता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोव्याची काळजी नाही,  हे त्यांनी घेतलेल्या मोले आणि म्हादई बाबतच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे. कोविडच्या व्यवस्थापनात शिथिलता आणून त्यानी आपली अकार्यक्षमता दाखवून दिली आहे असे सरदेसाई म्हणाले.

गोव्याच्या प्रश्नासाठी लढणारे एनजीओ, विद्यार्थी, नागरिक यांच्या बरोबर गोवा फॉरवर्ड नेहमीच ठामपणे उभा राहिल असे आश्वासन देताना गोवेकारांना प्रादेशिक पक्षच न्याय देऊ शकतील असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या