गोव्यातील शेतकऱ्यांच्या काजूला मिळणार तीन कोटीचा हमीभाव

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

यंदा काजूचा दर प्रतिकिलो १०५ रुपयांपर्यंत खाली आला होता. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने १२५ रुपये हमीदर घोषित केला. ज्या शेतकऱ्यांनी १०५ रुपये दरात काजू विक्री केली.

सासष्टी : कोरोना संकटकाळात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत काजू उत्पादकांना झळ बसू नये, यासाठी सरकारने जाहीर केलेल्या हमीदराचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ३५०० शेतकऱ्यांनी हमीदरासाठी अर्ज केला असून हमीदर अनुदानाच्या रूपात ३ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. 

यंदा काजूचा दर प्रतिकिलो १०५ रुपयांपर्यंत खाली आला होता. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने १२५ रुपये हमीदर घोषित केला. ज्या शेतकऱ्यांनी १०५ रुपये दरात काजू विक्री केली. त्या शेतकऱ्यांना हमीदर देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. गोव्यात सुमारे ३५०० हजारच्या आसपास काजू उत्पादकांनी हमीदरासाठी अर्ज केले असून हमीदराच्या स्वरूपात सुमारे ३ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी संचालक नेव्हील आफोन्सो यांनी दिली. तर, हमीदर देण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यापर्यत पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यंदाच्या हंगामास सुरुवातीला १२५ रुपये दराने काजूची खरेदी झाली होती. परंतु, कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काजूची खरेदी व विक्री बंद झाली. लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग संकटात पडू नये, यासाठी सरकारने शेतीविषयक सर्व कामकाजास परवानगी दिली आणि यामुळे काजूची खरेदी व विक्री प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली. परंतु , लॉकडाऊनमध्ये काजूचा खरेदी दर १०५ रुपये प्रतिकिलो असा घसरल्याने काजूच्या दरात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या मागणीची दखल घेऊन सरकारने काजूसाठी १२५ रुपये हमीदर जाहीर केला, असे  आफोन्सो यांनी सांगितले.   

काजू उत्पादकांकडून यापूर्वी हमीदरासाठी अर्ज करण्यात येत नव्हता, कारण हमीदर बाजारमुल्याच्या खाली होता. पण, यंदा बाजारमूल्य हमीदराच्या खाली आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हमीदरासाठी अर्ज केला आहे. गोव्यात ३५०० हजाराच्या आसपास शेतकऱ्यांनी हमीदरासाठी अर्ज केला आहे. शेतकऱ्यांना हमीदरासाठी केलेल्या काजू एक हजार मेट्रिक टनवर पोहचत असून हमीदराच्या अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना ३ कोटी रुपये मिळणार आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना हमीदर देण्यास सुरुवात करण्यात आली असून जानेवारी महिन्यापर्यत हमीदर देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असे आफोन्सो यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या