‘स्‍वयंपूर्ण गोव्‍या’कडे वाटचाल; मंत्रिमंडळ बैठकीत दहा कलमी कार्यक्रमास मंजुरी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

गोवा सार्वजनिक प्रशासन संस्था आणि उच्च शिक्षण संचालनालय यांनी केलेल्या सर्वेक्षणावर आधारीत प्रत्येक गाव व शहर सर्व बाजूने स्वयंपूर्ण करण्याचा आराखडा तयार केला आहे.

पणजी: ‘स्वयंपूर्ण गोवा’ बनविण्‍यासाठी १० कलमी कार्यक्रमास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. १९१ पंचायत १४ पालिका क्षेत्रात हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. गोवा सार्वजनिक प्रशासन संस्था आणि उच्च शिक्षण संचालनालय यांनी केलेल्या सर्वेक्षणावर आधारीत प्रत्येक गाव व शहर सर्व बाजूने स्वयंपूर्ण करण्याचा आराखडा तयार केला आहे. २ ऑक्टोबरपासून राज्यभरात ही मोहीम राबवली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेखाली काम केले आहे. यात सर्व खात्यांचे कर्मचारी लोकांना सेवा देण्यासाठी गावात जाणार आहेत. वर्षभर हा कार्यक्रम सुरू राहील. मंत्रिमंडळासमोर आज त्याचे सादरीकरण करण्यात आले. मंत्र्यांनी केलेल्या सूचना यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. ते पुढे म्हणाले, गाव हा स्वयंपूर्ण होण्यासाठी गावातील गरजा गावातच भागल्या गेल्या पाहिजेत. या मूलभूत संकल्पनेवर आधारीत हा कार्यक्रम आहे. आज गोवा दूध, भाजीपाला, कोंबड्या, फुलांसाठी शेजारील राज्‍यांवर अवलंबून आहे. हे असे का घडते, याचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्याचा हा कार्यक्रम आहे. 

वार्षिक २२ कोटी रुपयांचा चारा लागतो हे सांगूनही पटणार नाही. त्याची शेती करता येते. ३० कोटी रुपयांचा भाजीपाला आणला जातो. हे चित्र पालटण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे लागणार आहे. हे या स्वयंपूर्ण गोवा योजनेत केले जाणार आहे, असे ते म्‍हणाले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी व्‍हावे!
कर्मयोगी ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. प्रत्येक सरकारी कर्मचारी व अधिकारी हा कर्मयोगीच असावा लागतो. तरच गावाचा विकास होतो. आजवर यासाठी खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. १८ खात्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. खात्यातील कर्मचाऱ्यांना आधी नागरिकांची सनद माहिती हवी. तरच ते सेवा बजावू शकणार आहेत. गावागावांत पूर्वतयारी सुरू झाली आहे, असे मुख्‍यमंत्री म्हणाले.

यावर असणार भर...
स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमांतर्गत शेती, पशुसंवर्धन, युवक, ज्येष्ठ नागरीक, महिला व स्वयंसहाय्य गट, पर्यटन, मत्स्योद्योग, निसर्ग संपदा, योजना व त्यांची अंमलबजावणी तसेच सर्वसाधारण आणि सुशासन यावर भर दिला जाणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या