गोव्यातील निवासी हॉटेल्सना पर्यटन खात्याचा परवाना सक्तीचा

गोव्यातील निवासी हॉटेल्सना पर्यटन खात्याचा परवाना सक्तीचा
The Goa government cannot stop tourists from coming to Goa

पणजी: राज्यात निवासी हॉटेल्सना पर्यटन खात्याचा परवाना सक्तीचा आहे तरीही काहीजण परवाना नसताना बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहे. त्यामुळे खात्यातर्फे हॉटेल्सची तपासणी सुरू करण्यात आली असून जे कोणी आढळून येतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी दिला आहे. 


पर्यटनमंत्री आजगावकर म्हणाले की, काही हॉटेल्स चालकांनी परवाना न घेता व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास दिसून आले त्यामुळे खात्याच्या अधिकाऱ्यांना तपासणीचे निर्देश दिले आहेत. गोवा सरकार पर्यटकांना गोव्यात येण्यापासून रोखू शकत नाही. कोविड - १९ संदर्भात केंद्राने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे मात्र हॉटेल्स चालकांना सक्तीचे करण्यात येणार आहे. काही पर्यटक या सूचनांचे पालन करत नाहीत. मोठ्या प्रमाणात पर्यटक तोंडाला मास्क लावत नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचनांची आवश्‍यकता नाही. ज्या आहेत त्याचीच अंमलबजावणी करण्याकडे लक्ष देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. पर्यटक व्यवसाय सुरू झाल्याने राज्यात काही प्रमाणात पर्यटन स्थळे गजबजलेली दिसून येत आहे. 


दरम्यान, महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांतून येणाऱ्यांसाठी कोविड चाचणी अहवाल सक्तीचा केला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र प्रत्येक राज्याला परिस्थितीनुसार त्यात सुधारणा करण्याचा अधिकार आहे. गोव्यासाठी तरी सध्या त्याची आवश्‍यकता भासत नाही. काटेकोरपणे मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी यावर जोर देऊन कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कसिनो कार्यालयाच्या प्रवेशाच्या ठिकाणी मोठी गर्दी होते यासंदर्भात मंत्री आजगावकर म्हणाले की, कसिनो हे बंदर कप्तान खात्याच्या अखत्यारित येत असल्याने पर्यटन खात्याचा त्याच्याशी काही संबंध 
नाही.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com